अल्लू अर्जूनच्या घरचा बाप्पा पाहिलात का? विराजमान झाली गणपतीची सुंदर मुर्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 16:57 IST2024-09-08T16:57:01+5:302024-09-08T16:57:37+5:30
स्नेहा रेड्डीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अल्लू अर्जुन संपूर्ण कुटुंबासह बाप्पाचे स्वागत करताना आणि पूजा करताना दिसत आहे.

अल्लू अर्जूनच्या घरचा बाप्पा पाहिलात का? विराजमान झाली गणपतीची सुंदर मुर्ती!
Ganesh Mahotsav 2024 : आज राज्यभर नाहीतर देशभर गणरायांच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सिनेसृष्टीतदेखील सेलिब्रिटींनी वाजत गाजत गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) घरीदेखील जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
पुष्पा स्टार अल्लू अर्जूनच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. याचे फोटो अल्लू अर्जूनची पत्नी स्नेहा रेड्डी हिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने लिहलं, "भगवान गणेशाच्या कृपेने तुमचे घर आनंद, शांती आणि समृद्धीने भरून जवो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!".
स्नेहाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अल्लू अर्जुन संपूर्ण कुटुंबासह बाप्पाचे स्वागत करताना आणि पूजा करताना दिसत आहे. यावेळी अल्लू अर्जुन पांढऱ्या कुर्त्यामध्ये तर स्नेहा ही काळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे. तर त्यांचा मुलगादेखील काळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये अगदी छान दिसतोय. अल्लू अर्जूनच्या घरच्या बाप्पाची सुंदर मुर्ती डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. साध्या पद्धतीने पण रेखीव अशी सजावट केली आहे. या फोटोंना चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.
अल्लू अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'पुष्पा 2' या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमामुळे अल्लू अर्जून खूप चर्चेत आहे. हा चित्रपट सुरुवातीला 15 ऑगस्टला रिलीज होणार होता, पण पोस्ट-प्रॉडक्शनला उशीर झाल्यामुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आता 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता फहाद फासिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चाहते सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.