'जहाँ पर अन्याय होगा वहाँ पर मैं जरूर आऊंगा'; 'इंडियन २' ची पहिली झलक आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 18:35 IST2023-11-03T18:23:38+5:302023-11-03T18:35:31+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांच्या बहुप्रतिक्षीत 'इंडियन २' सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे.

'जहाँ पर अन्याय होगा वहाँ पर मैं जरूर आऊंगा'; 'इंडियन २' ची पहिली झलक आली समोर
दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षीत 'इंडियन २' सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. यात कमल हासन यांचा लुक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या लुकमध्ये कमल हासन यांना ओळखता येत नाहीये.
आमिर खान फिल्म्स प्रोडक्शनने हिंदी भाषेतील 'इंडियन २' चा इंट्रो शेअर केला आहे. हिंदी भाषेत या चित्रपटाचे नाव 'हिंदुस्थानी २' असे ठेवण्यात आले आहे. 'इंडियन २' च्या इंट्रोची सुरुवात कमल हासन यांच्या 'जहाँ पर अन्याय होगा वहाँ पर मैं जरूर आऊंगा' या डायलॉगने होते. कमल हासन यांच्यासह काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, सिद्धार्थ आणि ब्रह्मानंदम सारखे कलाकारही इंट्रोमध्ये पाहायला मिळत आहेत.
'इंडियन २' हा चित्रपट १९९६ मध्ये रिलीज झालेल्या कमल हासनच्या 'इंडियन' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एस शंकर यांनी केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. सुमारे २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात कमल हसन भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसणार आहे. चेन्नई, भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये येथे चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. जोहान्सबर्ग आणि तैवानमध्येही काही भाग शूट करण्यात आले आहेत.
कमल हासन हे उत्कृष्ट अभिनेते तर आहेतच, शिवाय ते उत्तम दिग्दर्शक, लेखक, गायकही आहेत. आजतागायत त्यांनी अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. त्यांचा ‘इंडियन २’ सिनेमागृहात कधी प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर केली नाही. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 'इंडियन २' प्रदर्शित होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘इंडियन २’ बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार हे नक्की आहे.