प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 10:25 AM2024-11-04T10:25:08+5:302024-11-04T10:26:35+5:30
कन्नड दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. रविवारी (३ नोव्हेंबर) त्यांचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कन्नड दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. रविवारी (३ नोव्हेंबर) त्यांचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. बंगळूरूमधील मदनायकनहल्ली भागातील एका फ्लॅटमध्ये ते राहत होते. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्या लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर गुरूप्रसाद यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस करत आहे.
गुरुप्रसाद गेल्या काही महिन्यांपासून बंगळूरुमधील या फ्लॅटमध्ये राहत होते. चार-पाच दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांना घरात जाताना पाहिलं होतं. पण, त्यानंतर मात्र ते दिसले नाहीत. काही दिवसांनी घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा घराचं दार उघडल्यानंतर गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक सीके बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुप्रसाद आर्थिक तणावात होते. यातूनच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. "दिग्दर्शक त्यांचा सिनेमा आणि अन्य काही गोष्टींमुळे तणावात होते. ते आर्थिक तणावात असल्याची माहिती मिळाली आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी शेजारच्या लोकांनी त्यांना घरात येताना पाहिलं होतं. पण, त्यानंतर मात्र घराबाहेर पडताना त्यांना कोणी पाहिलं नाही. पाच-सहा दिवसांपूर्वीच त्यांनी फाशी घेत आत्महत्या केली असावी", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते. अलिकडेच प्रदर्शित झालेला त्यांचा रंगनायका सिनेमाही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्यामुळेच ते आर्थिक कचाट्यात सापडले होते. आत्महत्या करण्यामागचं हेदेखील एक कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.