गेलेले केस अन् सुजलेला चेहरा; ६२व्या वर्षी अभिनेत्याने ब्लड कॅन्सरवर केली मात, ओळखणंही झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:02 IST2025-01-02T11:02:02+5:302025-01-02T11:02:32+5:30

कन्नड अभिनेता आणि निर्माता शिव राजकुमार यांना देखील ब्लड कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सरवर उपचार घेत आता ते यातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

kannada actor shiv rajkumar wins the battle with cancer shared health update | गेलेले केस अन् सुजलेला चेहरा; ६२व्या वर्षी अभिनेत्याने ब्लड कॅन्सरवर केली मात, ओळखणंही झालं कठीण

गेलेले केस अन् सुजलेला चेहरा; ६२व्या वर्षी अभिनेत्याने ब्लड कॅन्सरवर केली मात, ओळखणंही झालं कठीण

सोनाली बेंद्रे, महिमा चौधरी, संजय दत्त, मनिषा कोईराला, ताहिरा कश्यप या सेलिब्रिटींनी कॅन्सरसारख्या आजाराशी दोन हात करत त्यावर मात केली. कन्नड अभिनेता आणि निर्माता शिव राजकुमार यांना देखील ब्लड कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सरवर उपचार घेत आता ते यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केल्यानंतर शिव राजकुमार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत हेल्थ अपडेट दिले आहेत. 

६२ वर्षीय शिव राजकुमार यांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना केला. चाहत्यांबरोबर त्यांनी आयुष्यातील या कठीण काळाबाबत भाष्य करत त्यांची जर्नी शेअर केली आहे. मियामी येथे शिव राजकुमार यांनी कॅन्सरवर उपचार घेतले. यातून आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. "मी खूप घाबरलो होतो. पण, डॉक्टर, नातेवाईक, चाहते आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याने धीर मिळाला. माझी पत्नी आणि कुटुंबीयांनी खूप काळजी घेतली", असं शिव राजकुमार म्हणाले. 


मियामीमध्ये शिव राजकुमार यांनी केमोथेरेपी घेतली. डिसेंबरमध्ये त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यांचं मूत्रपिंडही रिप्लेस करण्यात आल्याची माहिती अभिनेत्याने दिली. डॉक्टरांनी एक महिना विश्रांती घेण्यास तसंच काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचं शिव राजकुमार यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. या व्हिडिओत शिव राजकुमार यांना ओळखणंही कठीण झालं आहे. केमोथेरेपीमुळे त्यांच्या डोक्यावरचे केस गेले आहेत. तर चेहऱ्यावरही सूज आल्याचं दिसत आहे. त्यांची अशी अवस्था पाहून चाहत्यांना चिंता जाणवत आहे. पण, त्यांनी कॅन्सरवर मात केल्याने चाहत्यांची काळजी थोडी कमी झाली आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहते शिव राजकुमार यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

Web Title: kannada actor shiv rajkumar wins the battle with cancer shared health update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.