'त्याच्यासारखे लोक...'; बेडरुम सीनविषयी बोलणाऱ्या अभिनेत्यावर तृषा कृष्णनने केली आगपाखड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:58 AM2023-11-20T08:58:46+5:302023-11-20T09:00:00+5:30
Trisha krishnan: तृषाने यापुढे कधीही मंसूर अली खानसोबत काम करणार नाही असंही स्पष्ट केलं आहे.
दलपति विजय याचा 'लियो' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. एकीकडे या सिनेमाला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळत आहे. तर, दुसरीकडे या सिनेमातील अभिनेत्री तृषा कृष्णन (Trisha krishnan) आणि अभिनेता मंसूर अली खान ही जोडी चर्चेत येत आहे. अलिकडेच लियोमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या मंसूर अली खानने तृषाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर आता तृषाने त्याला प्रत्युत्तर देत संताप व्यक्त केला आहे.
तृषाने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत तिची नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर या पुढे त्याच्यासोबत कधीही काम करणार नाही असंही स्पष्ट केलं आहे. तृषाने तिची नाराजी व्यक्त केल्यानंतर मंसूरने त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मंसूरने इन्स्टाग्रामवरुन त्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र, त्यानंतरही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
काय म्हणाली तृषा?
मंसूर अली खानने तृषाबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्यानंतर अभिनेत्रीने त्याला तीव्र कठोर शब्दांत सुनावलं आहे. "नुकताच एक व्हिडीओ माझ्या पाहण्यात आला आहे. ज्यात मंसूर अली खानने माझ्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि वाईट भाषेत भाष्य केलं आहे. मी याचा तीव्र विरोध करते. त्याची ही टिप्पणी स्त्रीविरोधी, अपमानकारक, अत्यंत वाईट आणि तिरस्कार करण्याजोगी आहे. त्याने माझ्यासोबत काम करण्याचं स्वप्न पाहात रहावं. पण, अशा वाईट व्यक्तीसोबत मी स्क्रीन शेअर केली नाही यासाठी मी फार आभारी आहे. आणि, माझ्या उर्वरित करिअरमध्येही मी त्याच्यासोबत कधीच काम करणार नाही. त्याच्यासारखे लोक माणुसकीला बदनाम करतात", अशी पोस्ट तृषाने शेअर केली आहे.
A recent video has come to my notice where Mr.Mansoor Ali Khan has spoken about me in a vile and disgusting manner.I strongly condemn this and find it sexist,disrespectful,misogynistic,repulsive and in bad taste.He can keep wishing but I am grateful never to have shared screen…
— Trish (@trishtrashers) November 18, 2023
नेमकं काय आहे प्रकरण?
अभिनेता मंसूर अली खान याला चित्रपटात तृषासोबत एक सीन करायचा होता. याविषयी त्याने त्याच्या व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे. "जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचाय त्यावेळी मी मला वाटलं की हा एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी यापूर्वीही अनेक बलात्काराचे सीन शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. परंतु, काश्मीरमध्ये शूटिंग सुरु असताना मला तृषाला पाहायला सुद्धा दिलं नाही", असं मंसूर अली खान म्हणाला.
दरम्यान, मंसूर अली खान याचं व्यक्तव्य ऐकल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर, लियोचे दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.