यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने संपवलं जीवन; आयुष्यात एकटी पडल्यामुळे घेतला होता निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:51 PM2023-09-18T12:51:18+5:302023-09-18T12:51:46+5:30
Silk smitha: १७ वर्षांच्या कारकिर्दीत स्मिताने चक्क ४५० सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं.
कलाविश्व म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कलाकार, त्यांचं लक्झरी लाइफस्टाइल, स्टारडम अशा कितीतरी गोष्टी येतात. यात काही कलाकारांनी अमाप यश, संपत्ती, पैसे मिळवला पण ज्यावेळी या सगळ्याचा उपभोग घ्यायची वेळ आली त्यावेळी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सिल्क स्मिता. आपल्या बोल्डनेसमुळे सिल्क स्मिताने दाक्षिणात्य कलाविश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवली. इंडस्ट्रीमध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये तिने पैसा, यश, प्रसिद्धी सारं काही मिळवलं. परंतु, आयुष्यात असा एक क्षण आला ज्यामुळे तिने तिच्या जीवनाचा अंत केला.
सिल्क स्मिताने तिच्या बोल्डनेसमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र, खऱ्या आयुष्यात तिला फार एकाकी जीवन जगावं लागलं. तिच्या आयुष्यात इतके चढउतार आले की तिने अखेर जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. स्मिताने अत्यंत कमी वयात तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी सिनेमांमध्ये स्मिताने काम केलं. विशेष म्हणजे पाहता पाहता ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. सिल्क स्मिताने जवळपास १६ वर्ष कलाविश्वात काम केलं.
१७ वर्षांच्या कारकिर्दीत स्मिताने चक्क ४५० सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे स्मिताला शिक्षण पूर्ण करता आलं नाही. मात्र, घरची परिस्थिती बरी नसल्यामुळे वयाच्या १४ व्या वर्षीच घरातल्यांनी तिचं लग्न लावून दिलं. परंतु, लग्नानंतर तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. अखेर सततच्या मारहाणीला कंटाळून तिने नवऱ्याचं घर सोडलं. त्यानंतर तिने सिनेसृष्टीची वाट धरली. विशेष म्हणजे कलाविश्वात पहिला ब्रेक मिळाल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
असा झाला आयुष्याचा अंत
सिल्क स्मिताचं खरं नाव विजयलक्ष्मी होतं. मात्र, इंडस्ट्रीत आल्यावर तिने तिचं नाव बदललं. मीडिया रिपोर्टनुसार, सिल्क स्मिताने कलाविश्वात आल्यानंतर एका व्यावसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केलं. मात्र, दुसऱ्या लग्नातही तिचा पहिल्या लग्नाप्रमाणेच मनस्ताप सहन करावा लागला. इतकंच नाही तर दुसरीकडे तिच्या बोल्ड इमेजमुळे कलाविश्वातही तिला अनेकांनी दुय्यम वागणूक द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे सिल्क स्मिता खऱ्या आयुष्यात प्रचंड एकाकी पडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सिल्क स्मिताने वयाच्या ३५ व्या वर्षी आत्महत्या केली. तिने आत्महत्या केल्या नंतर पोलिसांनी तिच्या मृतदेहाजवळ एक पत्र आढळून आलं. यात मी माझ्या आयुष्यात आनंद नसल्याचं तिने म्हटलं होत.