हेमा समितीच्या अहवालानंतर मोहनलाल यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "इंडस्ट्रीला बर्बाद करु नका"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 09:45 AM2024-09-01T09:45:04+5:302024-09-01T09:45:47+5:30

असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्ट्सचे अध्यक्ष सुपरस्टार मोहनलाल यांनी पदावरुन राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं.

Mohanlal reaction on Hema committee report malyalam cinema sexual harassment claims | हेमा समितीच्या अहवालानंतर मोहनलाल यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "इंडस्ट्रीला बर्बाद करु नका"

हेमा समितीच्या अहवालानंतर मोहनलाल यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "इंडस्ट्रीला बर्बाद करु नका"

मल्याळम सिनेसृष्टी सध्या हेमा समितीच्या रिपोर्टमुळे हादरली आहे. अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याचं अहवालात समोर आलं आहे. यामुळे बरेच मल्याळम सेलिब्रिटी यात अडकले आहेत. दरम्यान असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्ट्सचे अध्यक्ष सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) यांनी पदावरुन राजीनामा दिला.  आता त्यांनी या एकंदरच मल्याळम सिनेसृष्टीत घडत असलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.

मोहनलाल तिरुवनंतपुरममध्ये 'केरळ क्रिकेट लीग'च्या ओपनिंग सेरेमनीसाठी आले होते. या इव्हेंटमध्ये त्यांनी माध्यमांशी बातचीत करताना हेमा समितीच्या रिपोर्टवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "समितीचा अहवाल स्वागतार्ह आहे. मी समितीसमोर दोन वेळा आलो आहे. माझी विनंती आहे की कृपया इंडस्ट्रीला बर्बाद करु नका. आम्ही समितीच्या अहवालाचं स्वागतच करतो. अहवाल जारी करणं हा सरकारचा योग्य निर्णय होता."

ते पुढे म्हणाले, "मी गेल्या दोन टर्मपासून एमएमएमचा अध्यक्ष होतो. हेमा समितीच्या अहवालावर संपूर्ण मल्याळम इंडस्ट्री उत्तर देण्यास बंधनकारक आहे. आपण बघितलं तर सगळे प्रश्न हे एमएमएमलाच विचारण्यात येत आहे. असोसिएशन सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. प्रत्येकाला हे प्रश्न विचारले गेले पाहिजे. आपली इंडस्ट्री खूप मेहनती आहे. यात अनेक लोक सामील आहेत म्हणून प्रत्येकालाच दोषी ठरवलं जाऊ शकत नाही. जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा मिळेल. इंडस्ट्रीला संपवू नका. आता बरेच लोक म्हणत आहेत की असं होऊ नये. असोसिएशन असं पाहिजे. या सर्वांनीच पुढे येऊन निवडणूक लढवली पाहिजे. हे एक संकट आहे. सगळे मिळून याचा सामना करुया."

काय आहे हेमा कमिटी?

गेल्या अनेक वर्षांपासून प्रादेशिक चित्रपटसृष्टीशी संबंधित अशा अनेक घटना समोर येत आहेत, ज्यामध्ये महिला कलाकारांना चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात अनेक बड्या चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याकडून आक्षेपार्ह मागणी केल्याचे उघड झालं आहे. शूटिंगदरम्यान त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे काही महिला कलाकारांनी सांगितले आहे. या वाढत्या केसेस पाहता २०१९ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती हेमा यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती, जी अशा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवत होती. समितीच्या स्थापनेनंतर सुमारे ४ वर्षांनी १९ ऑगस्टला हेमा समितीने केरळ सरकारला २३३ पानांचा अहवाल सादर केला. ज्यामध्ये अनेक बड्या कलाकारांकडून होणारे शोषण समोर आले. रिपोर्ट्स येताच अनेक अभिनेत्री आपल्यासोबत झालेल्या शोषणाचा खुलासा करत आहेत.

Web Title: Mohanlal reaction on Hema committee report malyalam cinema sexual harassment claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.