लग्नानंतर नवविवाहित जोडपं देवदर्शनाला, नागा चैतन्य-शोभिताचा व्हिडिओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 05:26 PM2024-12-06T17:26:00+5:302024-12-06T17:26:20+5:30
शोभिता आणि नागा चैतन्यने आंध्र प्रदेशातील भ्रामराम्बा सहिता मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
साऊथ स्टार नागा चैतन्य आणि बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांनी ४ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने शोभिता आणि नागा चैतन्य यांनी लग्न केलं. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा शाही सोहळा पार पडला. लग्नानंतर नागा चैतन्य आणि शोभिता पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
शोभिता आणि नागा चैतन्य हे नवविवाहित जोडपं लग्नानंतर देवदर्शनाला गेलं आहे. शुक्रवारी(६ डिसेंबर) शोभिता आणि नागा चैतन्यने आंध्र प्रदेशातील भ्रामराम्बा सहिता मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यांच्याबरोबर नागार्जुनदेखील होते. यावेळी नागा चैतन्य आणि शोभिता कॅमेऱ्यात स्पॉट करण्यात आलं. त्यांचे फोटो आणि काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शोभिता आणि नागा चैतन्यने पारंपरिक पेहराव केला होता. नागा चैतन्यने लुंगी नेसली होती. तर नववधू शोभिता साडीमध्ये दिसून आली.
नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. त्याने २०१७ मध्ये समांथाशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर अवघ्या ४ वर्षांतच घटस्फोट घेत ते वेगळे झाले. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य शोभिता धुलिपालाला डेट करत होता. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल केलेलं नव्हतं. अखेर ऑगस्ट महिन्यात साखरपुडा करत नागा चैतन्य आणि शोभिताने त्यांचं रिलेशनशिप कन्फर्म केलं होतं.