लग्नानंतरच्या आयुष्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाला नागा चैतन्य, म्हणाला, "काहीच महिने झालेत पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:02 IST2025-01-31T18:01:54+5:302025-01-31T18:02:54+5:30
नागा चैतन्य आगामी 'थांडेल' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनवेळी त्याने आपल्या दुसऱ्या लग्नानंतरच्या आयुष्याचा उलगडा केला.

लग्नानंतरच्या आयुष्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाला नागा चैतन्य, म्हणाला, "काहीच महिने झालेत पण..."
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. समंथाशी घटस्फोटानंतर काही वर्षातच त्याने शोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. नागा चैतन्य सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. त्यामुळे या लग्नाची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा झाली. नागा चैतन्य आगामी 'थांडेल' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत साई पल्लवी देखील आहे. सिनेमाच्या प्रमोशनवेळी नागा चैतन्यने लग्नानंतरचं आयुष्य कसं सुरु आहे यावर प्रतिक्रिया दिली.
हिंदुस्तान टाईम्स ला दिलेल्या मुलाखतीत नागा चैतन्य म्हणाला, "वैवाहिक आयुष्य खूप छान सुरु आहे. मी तर खूप आनंद घेत आहे. आमच्या लग्नाला काहीच महिने झाले आहेत. आम्ही दोघंही काम आणि कुटुंबाला समान वेळ देतो. त्यामुळे आम्ही प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात व्यवस्थित ताळमेळ साधला आहे. मला वाटतं आमच्यातल्या याच एका गुणामुळे आम्ही लगेच कनेक्ट झालो होतो."
नागा चैतन्यने विशाखापट्टणम येथे सिनेमाचं प्रमोशन केलं. शोभिता ही तिथलीच आहे. तो म्हणाला, "आम्ही दोघंही आंध्र प्रदेशमधलेच आहोत. शोभिता विशाखापट्टणमची आहे आणि मला हे शहर खूप आवडतं. आम्हा दोघांचं मूळ एकच आहे. फक्त शहरं वेगवेगळी आहेत. संस्कृती सारखीच आहे. तसंच आमचं सिनेमावरचं प्रेम, कलेवरचं प्रेम आम्हाला जोडून ठेवतं. आयुष्याबद्दल आम्ही नेहमीच आतुर असतो. त्यामुळे आमच्याकडे बोलायलाही खूप काही असतं. आम्हाला फिरायलाही तितकंच आवडतं."
नागा चैतन्यचा 'थांडेल' सिनेमा ७ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. नागा आणि साई पल्लवीच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.