पती विग्नेशच्या मिठीमध्ये नयनतारा, रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 06:51 PM2023-09-18T18:51:56+5:302023-09-18T18:57:39+5:30
अभिनेत्री नयनताराचा पती विघ्नेश शिवन हा आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.
साऊथची लेडी सुपरस्टार म्हणून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री नयनतारा आणि दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश शिवन हे ग्लॅमर जगतातील पॉवर कपल आहेत. 8 सप्टेंबर 2023 रोजी म्हणजेच आज विघ्नेश 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. यासाठी नयनताराने एक रोमँटिक पोस्ट केली आहे. शिवाय तिने काही खास फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नयनातारा आणि विग्नेश हे लव्हबर्ड्स अगदी रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. यामध्ये त्यांचा लूकही अगदी साधा आहे.
नयनाताराने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या खास प्रसंगी मला खूप काही लिहायचे आहे. पण मला कुठून सुरुवात करावी हे कळत नाही. तुझ माझ्यावर असलेलं प्रेम आणि आपल्या नात्यांचा ज्या प्रकारे तु सन्मान करतोस, हे पाहून मी स्व:ताला खूप भाग्यवान समजते. तुझ्यासारखं दुसरं कोणीही नाही. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि ते स्वप्नवत, अर्थपूर्ण बनवल्याबद्दल तुझे खूप आभार. तू प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे". नयनताराने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर जबरदस्त एन्ट्री घेतली होती. तेव्हापासून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
निर्माता-दिग्दर्शक विघ्नेश आणि नयनताराचीची पहिली भेट ही 2015 मध्ये 'नानुम राउडी धन' या चित्रपटातून झाली होती. एका वर्षानंतर एका पुरस्कार सोहळ्यात या जोडप्याने त्यांच्या नात्याची घोषणा केली. सात वर्षे डेटिंग केल्यानंतर गेल्या वर्षी जूनमध्ये दोघांनी लग्न केले. नयनतारा आणि विघ्नेश यांना सरोगसीद्वारे दोन मुले झाली आहेत.