'सालार'च्या क्लायमॅक्सचे हैदराबादमध्ये पुन्हा 10 दिवस शूटिंग, रिलीज डेट पुन्हा लांबणीवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:07 PM2023-09-26T12:07:50+5:302023-09-26T12:08:27+5:30
'सालार'च्या क्लायमॅक्सचे हैदराबादमध्ये पुन्हा 10 दिवस शूटिंग होणार आहे.
सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'सालार' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. पण, हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार नसल्याचे कयास लावले जात आहेत. कारण चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील हे क्लायमॅक्स पुन्हा शूट करण्याचा विचारात आहेत. यासाठी ते टीमसोबत हैदराबादलाही पोहोचलेत. 10 दिवस येथे काही शॉट्स पुन्हा शूट करण्यात येणार आहेत.
बहुचर्चित मेगा बजेट चित्रपट "सालार"ची रिलीज तारीख सतत पुढे ढकलण्यात येत आहे. सुरवातील हा चित्रपट 28 सप्टेंबरला रिलीज होणार होता. परदेशात चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग झाले होते. पण, अचानक निर्मात्यांनी चित्रपट वेळेवर प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. तेव्हापासून हा चित्रपट नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो अशी चर्चा होती.
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा प्रशांत यांनी संपूर्ण चित्रपट पाहिला, तेव्हा ते त्यातील काही शॉट्सवर खूश नव्हते. म्हणून क्लायमॅक्सचे काही शॉट्स पुन्हा शूट करणे गरजेचे आहे, असे त्यांना वाटले. यावर त्यांनी निर्मात्यांशी चर्चा केली आणि त्यांनीही प्रशांत यांना पाठिंबा देत चित्रपटाचे बजेट वाढवले. आता चित्रपटाचे री-शूट तर बाकी आहेत. शिवाय आधीपासूनच रखडलेल्या 600 VFX शॉट्सवर काम करायचे आहे. अशा स्थितीत या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणे कठीण आहे.
सालार चित्रपटात प्रभासशिवाय श्रुती हासन, जगपती बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार दिसणार आहेत. तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नील यांनी सांभाळली. याआधी प्रशांत यांनी 'केजीएफ चॅप्टर 1' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली पण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात हा सिनेमा कमी पडला. त्यामुळे आता 'सालार' नक्की किती कमाई करतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.