बाबो! 'पुष्पा २' बघायचा विचार करताय? आधी किंमत बघा, 'इतके' हजार रुपयांना विकलं जातंय एक तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 01:32 PM2024-12-01T13:32:36+5:302024-12-01T13:34:09+5:30
प्रदशर्नाआधीच 'पुष्पा २'चे शोज हाऊसफूल झाले आहेत. अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. तर काही ठिकाणी सिनेमाच्या तिकिटांचे भावही वधारले आहेत.
Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २'ची गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. अखेर हा सिनेमा ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा २'साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रदशर्नाआधीच 'पुष्पा २'चे शोज हाऊसफूल झाले आहेत. अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. तर काही ठिकाणी सिनेमाच्या तिकिटांचे भावही वधारले आहेत.
'पुष्पा :द राईज' या सिनेमानंतर चाहते 'पुष्पा २ : द रुल' या सिनेमाच्या प्रतिक्षेत होते. या सीक्वलसाठी तब्बल ३ वर्ष चाहत्यांना वाट पाहावी लागली. अनेक वेळा सिनेमाची रिलीज डेटही बदलण्यात आली. त्यामुळेच 'पुष्पा २'बाबत चाहत्यांची प्रतिक्षा आणखी वाढली. यामुळेच की काय 'पुष्पा २'चं अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच थिएटर हाऊसफूल झाले आहेत. दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये काही थिएटरमध्ये 'पुष्पा २'च्या सिनेमाच्या तिकिटांची किंमत हजारोंच्या घरात पोहोचली आहे.
दिल्लीतील PVR थिएटरमध्ये 'पुष्पा २'च्या हिंदी व्हर्जनची तिकिटे हजारो रुपयांनी विकली जात आहे. बुक माय शोवर एका तिकिटासाठी तब्बल १२०० रुपये मोजावे लागत आहेत. तर मुंबईतील थिएटरमध्येही १००० रुपयाला एक तिकीट विकले जात आहे. IMAX मध्येही तिकिटांचे दर हजारोंच्या घरात आहेत.
'पुष्पा २' सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला मिळणारा प्रतिसाद पाहून 'पुष्पा २' पहिल्याच दिवशी ३०० कोटींच्या कमाईचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.