डीपफेक व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली "आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 05:12 PM2023-11-06T17:12:17+5:302023-11-06T17:13:17+5:30
नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुष्पा फेम अभिनेत्रीचा हा व्हायरल व्हिडिओ फेक होता. यावर आता रश्मिकाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुष्पा फेम अभिनेत्रीचा हा व्हायरल व्हिडिओ फेक होता. मॉर्फ व्हिडिओ आणि ओरिजनल व्हिडिओ ट्वीट करत एका युजरने ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. या व्हायरल व्हिडिओवर बिग बी अमिताभ बच्चन यांनीही चिंता व्यक्त केली होती. आता खुद्द रश्मिकाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
रश्मिकाने व्हायरल झालेल्या डीप फेक व्हिडिओबाबत एक ट्वीट केलं आहे. "मला हे शेअर करताना अत्यंत दु:ख होत आहे. पण, ऑनलाईन व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओबाबत भाष्य करणं गरजेचं आहे. असा व्हिडिओ केवळ माझ्यासाठीच नाहीतर प्रत्येकासाठी भीतीदायक आहे. टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापरामुळे आपलं खूप नुकसान होत आहे.आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून मला पाठिंबा दिलेले कुटुंबीय, चाहते आणि मित्रपरिवाराची मी आभारी आहे. पण, जर मी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना हे माझ्याबरोबर घडलं असतं. तर याकडे मी कसं पाहिलं असतं याचा मी विचारही करू शकत नाही. अनेकांच्या बाबतीत हे घडण्याआधी एक समाज म्हणून याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे," असं रश्मिकाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
I feel really hurt to share this and have to talk about the deepfake video of me being spread online.
— Rashmika Mandanna (@iamRashmika) November 6, 2023
Something like this is honestly, extremely scary not only for me, but also for each one of us who today is vulnerable to so much harm because of how technology is being misused.…
रश्मिकाचा डिपफेक व्हायरल व्हिडिओ रिसर्चर अभिषेकने X वर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती आनंदाने उड्या मारत लिफ्टमध्ये जात असल्याचं दिसत होतं. त्यात तिला विचित्र पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओसोबत अभिषेकने लिहिले, 'डीपफेक विरोधात कायदेशीर कारवाई आणि नियम बनवण्याची तात्काळ गरज आहे. तुम्ही रश्मिका मंदानाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिला असेल. पण थांबा, ही रश्मिका नाही तर हा झारा पटेल नावाच्या महिलेचा डीपफेक व्हिडिओ आहे. झारा पटेल ही ब्रिटीश-भारतीय मुलगी आहे जिचे इन्स्टाग्रामवर ४ लाख फॉलोअर्स आहेत. तिने ९ ऑक्टोबरला हा व्हिडिओ अपलोड केला आहे. 'रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही चिंता व्यक्त केली आहे.'खरंच यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे," अशी कमेंट बिग बींनी केली आहे.