पुढच्या महिन्यात रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचा साखरपुडा? दोघांच्या टीमने सांगितलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 01:01 PM2024-01-10T13:01:27+5:302024-01-10T13:02:09+5:30
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे लव्हबर्ड्स सध्या सगळ्यांचेच फेवरेट आहेत.
'पुष्पा' फेम श्रीवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या Animal चं यश एन्जॉय करत आहे. रश्मिकाने 'मिशन मजनू' मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'गुडबाय' सिनेमातही झळकली. तर नुकत्याच रिलीज झालेल्या Animal सिनेमातही तिची चर्चा झाली. रश्मिकाचं प्रोफेशनल आयुष्य सध्या यशाच्या शिखरावर असतानाच वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आहे. रश्मिका विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत आहे. अद्याप दोघांनीही त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिलेली नाही. रश्मिका आणि विजयचा पुढील महिन्यात साखरपुडा असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यावरही दोघांकडून अधिकृत स्पष्टीकरण आलं नव्हतं. आता विजय देवरकोंडाच्या टीमकडूनच नेमकं सत्य समोर आलं आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे लव्हबर्ड्स सध्या सगळ्यांचेच फेवरेट आहेत. दोघांनी पहिल्यांदा 'गीता गोविंदम' सिनेमात एकत्र काम केलं होतं. तेव्हाच त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू प्रेमही फुलत गेलं. नंतर त्यांनी 'डिअर कॉम्रेड' सिनेमातही काम केलं. दोन्ही चित्रपट खूप हिट झाले. सध्या मनोरंजनसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे रश्मिका आणि विजयही पुढील महिन्यात साखरपुडा करत असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र नुकतंच विजयच्या टीमने या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीत काहीही तथ्य नाही. सध्या दोघंही आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
रश्मिका आगामी 'पुष्पा 2' मध्ये दिसणार आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' मध्ये तिने श्रीवल्लीची भूमिका साकारली आणि ती नॅशनल क्रश बनली. दुसऱ्या भागातही तिची महत्वाची भूमिका आहे. तर विजयचा काही दिवसांपूर्वी 'खुशी' हा सिनेमा रिलीज झाला.