KGF च्या 'रॉकी भाई' यशचा 'टॉक्सिक' जगभरात गाजणार, पण का? असं काय आहे या सिनेमात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:22 IST2025-02-10T13:48:40+5:302025-02-10T14:22:10+5:30
'टॉक्सिक' या सिनेमात काय आहे खास ? ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

KGF च्या 'रॉकी भाई' यशचा 'टॉक्सिक' जगभरात गाजणार, पण का? असं काय आहे या सिनेमात?
'केजीएफ' आणि 'केजीएफ चॅप्टर २' च्या प्रचंड यशानंतर सुपरस्टार यश (Rocking Star Yash) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 'टॉक्सिकः अफेयरी टेल फॉर ग्रोन अप्स' असं त्याच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. रॉकिंग स्टार यशचा 'टॉक्सिक' (Toxic) चित्रपट हा ड्रग माफियांच्या पार्श्वभूमीवर आधारित ॲक्शन-पॅक्ड चित्रपट आहे. 'टॉक्सिक'चं चित्रीकरण वेगाने सुरू आहे. पण, या सिनेमात असं काय खास आहे, ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.
'टॉक्सिक'ची पहिली खास गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या कथेची व्याप्ती फक्त पॅन इंडिया नाही तर जागतिक आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. सध्या चित्रपटाचे चित्रीकरण बंगळुरूमध्ये सुरू आहे. यापूर्वी 'टॉक्सिक'चे चित्रीकरण गोबा आणि मुंबईत झाले. सहसा एखाद्या चित्रपटात एक ते दोन अभिनेत्री असतात. पण, 'टॉक्सिक'मध्ये यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी आणि तारा सुतारिया झळकणार आहेत. यात नयनताराने अधिकृतपणे शूटिंगही सुरू केलं आहे. या चित्रपटात ब्रिटिश अभिनेते डॅरेल डि' सिल्वा आणि बेनेडिक्ट गॅरेटदेखील दिसतील.
विशेष म्हणजे हा चित्रपट सर्वाधिक महागडा चित्रपट ठरणार आहे. याआधी एस.एस. राजामौलीचा 'एसएसएमबी२९' हा चित्रपट सर्वांत महागडा चित्रपट असल्याचं बोललं जातं आहे. या चित्रपटाचे बजेट हे १००० कोटी रुपये ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर आता 'टॉक्सिक'या चित्रपटासाठी 'एसएसएमबी२९' या चित्रपटापेक्षा जास्त खर्च लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'टॉक्सिक' हा चित्रपट इंग्रजी आणि कन्नड भाषेत लिहिला आणि चित्रीत केला जातोय. तो इतर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्येही डब केला जाणार आहे. यश शेवटचा 'केजीएफ २' चित्रपटात दिसला होता. याशिवाय, यश नितेश तिवारीच्या 'रामायण' मध्ये देखील काम करतोय, ज्यामध्ये तो रणबीर कपूर आणि साई पल्लवीसोबत दिसेल. हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.