'गेम चेंजर'च्या प्री-रिलीज इव्हेंटनंतर अपघातात २ जणांचा मृत्यू; अभिनेता राम चरणकडून मदतीचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 09:11 IST2025-01-08T09:07:51+5:302025-01-08T09:11:07+5:30
'पुष्पा-२' नंतर सध्या साउथ इंडस्ट्रीत 'गेम चेंजर' चित्रपटाबद्दल चर्चा रंगली आहे.

'गेम चेंजर'च्या प्री-रिलीज इव्हेंटनंतर अपघातात २ जणांचा मृत्यू; अभिनेता राम चरणकडून मदतीचं आश्वासन
Ram Charan Game Changer movie: 'पुष्पा-२' नंतर सध्या साउथ इंडस्ट्रीत 'गेम चेंजर' चित्रपटाबद्दल चर्चा रंगली आहे. दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan)आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांची मुख्य भूमिका असलेला गेम चेंजर चित्रपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच गालबोट लागलं. अगदी गेल्या महिन्यात 'पुष्पा-२'सिनेमाच्या प्रिमिअरमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. त्याचबरोबर या महिलेचा नऊ वर्षांचा मुलाला सुद्धा गंभीर दुखापत झाली होती. त्यातच आता राम चरणच्या 'गेम चेंजर' चित्रपटाच्या इव्हेंटनंतर एक दुर्दैवी अपघात घडला. ज्या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर अभिनेता राम चरणेही मदतीचं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, 'गेम चेंजर' चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटनंतर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी राम चरणने त्यांच्या संपूर्ण टीमला पाठवलं होतं. मिळालेल्या माहितीनूसार, अभिनेत्याने या पीडित कुटुंबीयाना पाच लाख रुपयांच्या मदतीचं आश्वासन दिलं. आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम (राजमुंदरी) येथे सिनेमाचा प्री-रिलीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमात अरावा मणिकांता आणि थोकदा चरण हे दोघेही सहभागी झाले होते. कार्यक्रम आटोपल्यावर घरी परत येत असताना त्यांचा अपघात झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दोघे दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅनने त्यांना धडक दिली.
'गेम चेंजर' सिनेमा येत्या १० जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. एस. शंकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. RRR नंतर प्रमुख भूमिका असलेला राम चरणचा हा बहुचर्चित सिनेमा आहे. नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात हा सिनेमा पाहायला राम चरणचे चाहते आतुर आहेत.