Ram Charan : सुपरस्टार राम चरणने दिलेला शब्द पाळला, काय दिलं होतं वचन ? जानी मास्टरची पोस्ट चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 09:49 AM2024-07-05T09:49:52+5:302024-07-05T09:50:29+5:30
रामचरण केवळ अभिनेताच नाही तर एक व्यक्ती म्हणूनही खूप चांगला आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता रामचरण तेजा (Ramcharan Teja) केवळ साऊथ पुरताच मर्यादीत नाही. तर जगभरात त्याचे चाहते आहेत. तो कुठेही गेला तरी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत असतो. रामचरण RRR सिनेमामुळे ग्लोबल स्तरावर लोकप्रिय झाला. राजामौलींच्या या सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले. या सुपरस्टार्सच्या अभिनयासोबतच चाहत्यांना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा साधेपणा. रामचरण केवळ अभिनेताच नाही तर एक व्यक्ती म्हणूनही खूप चांगला आहे. नुकतेच त्यानं तब्बल 'डान्सर्स युनियन'च्या पाचशेहून अधिक सदस्यांना आरोग्य विमा प्रदान करत दिलेला शब्द पाळला आहे.
नुकतंच नृत्यदिग्दर्शक जानी मास्टरचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने जानी मास्टरने चिरंजीवी, राम चरण आणि उपासना यांच्याबरोबर काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले. यासोबतच राम चरण आणि उपासना यांनी त्याला वाढदिवशी कोणती भेट दिली, हेदेखील त्याने चाहत्यांसोबत शेअर केलं. याबद्दल जानी मास्टरने राम चरण आणि उपासना यांचे आभार मानले आहेत.
जानी मास्टरने पोस्टमध्ये लिहलं, 'माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्वात आवडत्या व्यक्ती चिरंजीवी आणि रामचरण यांचे मला आशीर्वाद मिळाले. याचा मला अत्यंत आनंद होत आहे. माझ्यावरील अतूट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी तुमचा सदैव कृतज्ञ आहे'. यासोबतच जानीने राम आणि उपासनाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. जानीने या फोटोला कॅप्शन देत तेलुगूमध्ये लिहिलं, 'योग्य वेळी मदत करणारा देवच असतो. मला स्पष्टपणे आठवतंय 'डान्सर्स युनियन'साठी मी राम आणि उपासनाजवळ मदत मागितली होती. पाचशेहून अधिक कुटुंबांसाठी आरोग्य विमा प्रदान करण्याचं वचन त्यांनी दिलं होतं आणि तो शब्द त्यांनी पूर्ण केलाय'.
पुढे त्यानं लिहलं "मागितलेली मदत लक्षात ठेवणे आणि दिलेल्या शब्दांना महत्त्व देणे ही काही सामान्य गोष्ट नाही. परंतु त्यांनी ते केलं. आमच्या सर्वांच्या मनात कृतज्ञतेची भावना कायम असेल. सर्वांच्यावतीने मी मनापासून आभार मानतो. मी भाग्यवान आहे की तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत मला करण्याची संधी मिळाली', अस जानीने लिहिलं.
जानी मास्टर तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये अनेक हिट गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केलं आहे. जेलरमधील कावला, किसी का भाई किसी की जानमधील यंतम्मा, बीस्टमधील आर्बी कुथू, पुष्पा: द राइजमधील श्रीवल्ली या गाण्यांमधून त्यानं आपला ठसा उमटवला आहे. तर रामचरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचंं झालं तर तो लवकरच "गेम चेंजर"मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत कियारा अडवाणी झळकणार आहे. चाहते या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.