काय? २४ तासात शूट झाला होता अख्खा सिनेमा, १४ दिग्दर्शक अन् ३० हून जास्त कलाकारांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 03:43 PM2023-10-11T15:43:55+5:302023-10-11T15:46:08+5:30
या सिनेमाचं शूट सुरु असताना सेटवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम उपस्थित होती.
एखादा सिनेमा बनवायचा झाल्यास अनेक महिने लागतात. अगदी वर्षही लागतात. सिनेमा शूट करणं त्यासाठी तेवढा वेळ देणं हे कठीण काम आहे. त्यामुळे एका दिवसात सिनेमा बनेल असं तर होऊ शकत नाही. पण भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा पराक्रम झाला आहे. एक सिनेमा जो केवळ फक्त २४ तासात तयार झाला आहे. या सिनेमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
हा तमिळ सिनेमा आहे ज्याचं नाव 'स्वयंवरम' असं आहे. या सिनेमाचं शूट सुरु असताना सेटवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम उपस्थित होती. कोणत्या सीनला शूट करण्यासाठी किती वेळ लागला याची ते नोंद करत होते. 'स्वयंवरम' हा सिनेमा १६ जुलै १९९९ रोजी रिलीज झाला होता. १४ दिग्दर्शकांनी मिळून हा सिनेमा दिग्दर्शित केला होता ज्यामध्ये तब्बल ३० हून जास्त कलाकार होते. विजयकुमार, मंजुला विजयकुमार, सत्यराज, रोजा, कस्तूरी, रंभा, प्रभुदेवा, कार्तिक, सेंथिल आणि मंसूर अली खान सारखे अनेक सेलिब्रिटी होते. ३ तासांचा हा सिनेमा २४ तासात शूट होऊन तयार झाला होता.
'स्वयंवरम' चे निर्माते गिरधारीलाल नागपाल यांनी १९ दिग्दर्शक, ४५ सहाय्यक दिग्दर्शक, १९ कॅमेरामन, ३६ असिस्टंट कॅमेरामन, १४ अभिनेते आणि १२ अभिनेत्री यांच्याशिवाय अनेक व्हिलनसोबत सिनेमा शूट झाला होता. सेटवर १५ फिल्म यूनिट होते. १ स्टील फोटोग्राफर आणि १४८३ एक्स्ट्रा कलाकार होते. नागपाल यांनी अनेक महिने फिल्मचं नियोजन केलं पण काहीच स्क्रीप्ट लिहिली नव्हती. स्क्रीप्टशिवायच कलाकारांना त्यांचे सीन्स समजावून दिले होते.
सिनेमा ११ भागांमध्ये विभागला गेला होता. प्रत्येक दिग्दर्शकाला एक एक भाग दिला गेला होता. सर्व दिग्दर्शकांनी एका दिवसात वेगवेगळ्या लोकेशन्सवर शूट केले. त्याआधी सर्व दिग्दर्शकांनी एकत्र बसून प्लॅनिंग केले होते. अशा प्रकारे 'स्वयंवरम' २४ तासात शूट होऊन तयार झाला.