Daniel Balaji: तमिळ अभिनेते डॅनियल बालाजी यांचं निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 09:29 AM2024-03-30T09:29:49+5:302024-03-30T09:30:10+5:30
Daniel Balaji Death: डॅनियल बालाजी यांचा साऊथमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना या बातमीमुळे धक्का बसला आहे.
Daniel Balaji Death: फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी आली आहे. तमिळ फिल्म अभिनेता डॅनियल बालाजीचं (Daniel Balaji) काल रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते केवळ 48 वर्षांचे होते. छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरही त्यांना वाचवू शकले नाहीत. एवढ्या कमी वयात अशी एक्झिट घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे.
नेहमी हसतमुख असणारे अभिनेते डॅनियल बालाजी आता या जगात नाहीत यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीए. कालच त्यांनी छातीत दुखत असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांना लगेच चेन्नई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते या धक्क्यातून सावरतील अशीच सर्वांना खात्री होती. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. 'हनुमान' फेम दिग्दर्शक मोहन राजा यांनी डॅनियल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते लिहिताता, 'वाईट बातमी. मी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. खूप चांगला मित्र. त्याच्यासोबत काम करता आलं नाही याचं कायम दु:ख राहील. ओम शांती.'
💔💔💔💔💔💔💔
— Mohan Raja (@jayam_mohanraja) March 29, 2024
Such a Sad news
He Was an inspiration for me to join film institute
A very good friend
Miss working with him
May his soul rest in peace #RipDanielbalajihttps://t.co/TV348BiUNJ
डॅनियल बालाजी यांच्या निधनाची बातमी ऐकताच चाहत्यांनाही धक्का बसला आहे.सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. तसंच त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. डॅनियल बालाडी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॅनियल बालाजी यांनी कमल हसन यांच्या 'मरुधनयगम' सिनेमात करिअरला सुरुवात केली होती. मात्र हा सिनेमा रिलीजच होऊ शकला नाही. नंतर त्यांनी टीव्ही माध्यमात काम केलं. 'चिट्ठी' मालिकेमुळे ते लोकप्रिय झाले. यानंतर ते पु्न्हा सिनेमांकडे वळले. त्यांना एकापेक्षा एक सुपरहिट तमिळ आणि मल्याळम सिनेमे केले. Vilaiyaadu, Polladhavam, Vada Chennai अशा काही सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. कमल हसन, थलपति विजय आणि सूर्या सारख्या सुपरस्टार्ससोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली.