'या' वेळेत १६ वर्षांखालील मुलांना थिएटरमध्ये नो एन्ट्री, उच्च न्यायालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 15:10 IST2025-01-28T15:09:30+5:302025-01-28T15:10:55+5:30
आता १६ वर्षाखालील मुलांना सिनेमा ठराविक वेळेतच पाहता येणार आहे.

'या' वेळेत १६ वर्षांखालील मुलांना थिएटरमध्ये नो एन्ट्री, उच्च न्यायालयाचे निर्देश
Restricts Children's Entry Into Movie Theatres: थिएटरचं मुलांना प्रचंड आकर्षण असतं. सिनेमा हा थिएटरमध्ये पाहण्यासाठी मुलं उत्सुक असतात. पण, थिएटरमध्ये १६ वर्षाखालील मुलांना कोणत्या वेळेत प्रवेश द्यावा, याबाबत कोणतेही नियम नाहीत. पण, आता १६ वर्षाखालील मुलांना सिनेमा ठराविक वेळेतच पाहता येणार आहे. याबाबत तेलंगणा उच्च न्यायालायने (Telangana High Court) निर्देश जारी केले आहेत.
तेलंगणा उच्च न्यायालयाने रात्री ११ नंतर चित्रपटगृहात १६ वर्षांखालील (Children's Entry Into Movie Theatres) मुलांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली. सकाळी ११ वाजण्यापूर्वी आणि रात्री ११ नंतर सिनेमा पाहण्यास बंदी घातली आहे. न्यायमूर्ती बी. विजयसेन रेड्डी यांनी म्हटलं की, "मुलांना सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा चित्रपट पाहण्याची परवानगी दिल्याने त्यांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो".
न्यायालयाने 'पुष्पा २' चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा उल्लेख केला. ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्समध्ये ११ वाजण्यापूर्वी आणि रात्री ११ नंतर १६ वर्षांखालील मुलांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व पक्षांना द्यावेत, अशी शिफारस उच्च न्यायालयाने केली आहे. तसेच मुलांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचा सल्ला प्रधान सचिव, गृह विभाग यांना देण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.