शब्द मागे घेत जाहीर माफी मागितली, काँग्रेस महिला नेत्यानं घटस्फोटावरुन केलेले वादग्रस्त विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:43 PM2024-10-03T13:43:11+5:302024-10-03T13:43:31+5:30
कोंडा सुरेखा यांनी एक ट्विट शेअर करत आपले विधान मागे घेतले आणि समांथाची जाहीर माफी मागितली आहे.
Samantha-naga Chaitanya Divorce : अभिनेत्री समांथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल (Samantha Naga Divorce) केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्या नेत्या आणि तेलंगणाच्या पर्यावरण तथा वनमंत्री कोंडा सुरेखा यांनी जाहीर माफी मागितली आहे. कोंडा सुरेखा यांनी समांथा अन् नागा चैतन्यच्या घटस्फोटासाठी बीआरएस नेते केटी रामाराव हे जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर समांथा, नागा चैतन्य आणि नागार्जुन यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
कोंडा सुरेखा यांनी एक ट्विट शेअर करत आपले विधान मागे घेतले आणि समांथाची जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी लिहलं, "माझ्या वक्तव्यामुळे तुझे किंवा तुझ्या चाहत्यांचे मन दुखावले असेल तर मी माझे शब्द बिनशर्त मागे घेते. कृपया याचा वेगळा अर्थ काढू नये. माझे विधान हे तुझ्या भावना दुखावण्यासाठी नव्हते. तर महिलांचा अपमान करणाऱ्या नेत्यावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी होते. तू ज्या पद्धतीने आत्मविश्वासाने पुढे जात आहेस, ते केवळ वाखाणण्याजोगे नाही तर एक आदर्श आहे", या शब्दात कोंडा सुरेखा यांनी समांथाचे कौतुक करत तिची माफी मागितली आहे.
నా వ్యాఖ్యల ఉద్దేశం మహిళల పట్ల ఒక నాయకుడి చిన్నచూపు ధోరణిని ప్రశ్నించడమే కానీ మీ @Samanthaprabhu2 మనోభావాలను దెబ్బతీయడం కాదు.
— Konda surekha (@iamkondasurekha) October 2, 2024
స్వయం శక్తితో మీరు ఎదిగిన తీరు నాకు కేవలం అభిమానం మాత్రమే కాదు.. ఆదర్శం కూడా..
काय म्हणाल्या होत्या कोंडा सुरेखा ?
समांथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटासाठी बीआरएस नेते केटी रामाराव हे जबाबदार आहेत, असा दावा कोंडा सुरेखा यांनी केला होता. केटीआर यांच्यावर अनेक आरोप सुरेखा यांनी केले होते. "नागार्जुनच्या एन कन्वेन्शन सेंटरला तोडलं जाणार नाही त्याबदल्यात समंथाला त्यांनी आपल्याकडे पाठवावं", अशी मागणी केटी रामा राव यांनी नागार्जुनकडे केली होती, असा दावा कोंडा सुरेखा यांनी केला. तसेच केटीआरला हिरोईनचे शोषण करण्याची सवय आहे. त्याने अनेक अभिनेत्रींना ड्रग्जचे व्यसन लावले आहे. दोघांचे फोनही टॅप करण्यात आले होते", असे त्या म्हणाल्या होत्या.
कोंडा सुरेखा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर समांथा भडकली. तिने सोशल मीडिावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली. तसेच समांथाचे माजी सासरे अभिनेता नागार्जुननेही एक पोस्ट शेअर करत रोखठोक उत्तर दिलं आहे. राजकीय मंडळींसह कलाविश्वातील कलाकारांनी कोंडा सुरेखा यांच्यावर टीका केली. दरम्यान, दुसरीकडे KTR यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. केटी रामाराव यांनी कोंडा सुरेखा यांना इशारा दिलेला की, त्यांनी २४ तासांत माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरुद्ध मानहानीचा आणि फौजदारी खटला दाखल करण्यात येईल.