मुलीसोबत शिक्षणावरुन भांडण अन् गायिकेचा थेट आत्महत्येचा प्रयत्न, म्हणाली- "मी झोपेच्या १८ गोळ्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:44 IST2025-03-06T12:44:24+5:302025-03-06T12:44:43+5:30
मुलीसोबत भांडण झाल्याने गायिकेने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

मुलीसोबत शिक्षणावरुन भांडण अन् गायिकेचा थेट आत्महत्येचा प्रयत्न, म्हणाली- "मी झोपेच्या १८ गोळ्या..."
तेलुगुमधील प्रसिद्ध गायिका कल्पना राघवेंद्रने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. ४४ वर्षीय कल्पना तिच्या राहत्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. दोन दिवस कल्पना बेशुद्ध होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने गायिकेला रुग्णालयात दाखल केलं होतं. आता गायिकेचं आत्महत्या करण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. शुद्धीवर आल्यानंतर कल्पनाने पोलिसांकडे जबाब नोंदविला आहे.
मुलीसोबत भांडण झाल्याने गायिकेने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. "सोमवारी, ३ मार्चला मुलगी दया प्रसादसोबत माझं भांडण झालं होतं. तिने हैदराबादमध्ये शिकावं, असं मला वाटतं. पण, याला तिने नकार दिला. मी ४ मार्चला एर्नाकुलमवरुन घरी आले होते. पण, मला काही केल्या झोप येत नव्हती. म्हणून मी आधी ८ गोळ्या खाल्ल्या. पण, तरीही मला झोप आली नाही. मग मी अजून १० गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर मी बेशुद्ध झाले. त्यानंतर काय झालं ते मला माहीत नाही", असं कल्पना राघवेंद्रने पोलिसांना सांगितलं.
कल्पनाचे पती प्रभाकर चेन्नईला होते. पत्नी फोन उचलत नसल्यामुळे त्यांना चिंता वाटू लागली. म्हणून त्यांनी बिल्डिंगच्या काही सदस्यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये कल्पना बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. त्यानंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं.