"...मग तामिळ चित्रपट हिंदीत डब कशाला करता?", भाषावादावरून पवन कल्याण यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 15:23 IST2025-03-15T15:21:06+5:302025-03-15T15:23:09+5:30
Pawan Kalyan Criticize Tamil nadu Government: सध्या तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषावादावरून दक्षिणेतील प्रख्यात अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्टॅलिन आणि डीएमकेला नाव न घेता टोला लगावला आहे.

"...मग तामिळ चित्रपट हिंदीत डब कशाला करता?", भाषावादावरून पवन कल्याण यांचा सवाल
मागच्या काही दिवसांपासून हिंदी आणि तामिळ भाषेवरून तामिळनाडू आणि केंद्रातील वातावरण तापलेलं आहे. नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्राला तीव्र विरोध करत आम्ही हिंदी भाषेचं आक्रमण सहन करणार नाही, अशी आक्रमक भूमिका तामिळनाडू सरकारने घेतली आहे. एवढंच नाही तर हिंदीशी साधर्म्य साधणारं रुपयाचं ₹ हे चिन्ह देखील अर्थसंकल्पामधून हटवण्याचा निर्णय स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर दक्षिणेतील प्रख्यात अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्टॅलिन आणि डीएमकेला नाव न घेता टोला लगावला आहे.
हिंदी आणि तामिळ भाषेवरून सुरू असलेल्या वादावरून पवन कल्याण यांनी तामिळनाडूमध्ये ढोंगीपणा सुरू असल्याचा आरोप केला आहे. तिथले नेते आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तामिळ चित्रपटांचं हिंदीमध्ये डबिंग करण्याला परवानगी देतात. भाषेला मात्र विरोध करतात, अशी टीका पवन कल्याण यांनी केली.
आपल्या जनसेना पक्षाच्या वर्धापनदिनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना पवन कल्याण म्हणाले की, देशाच्या अखंडतेसाठी बारताला तामिळसह इतर भाषांचीही आवश्यकता आहे. यावेळी डीएमके किंवा स्टॅलिन यांचं नाव न घेता पवन कल्याण म्हणाले की, तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा लादण्याचा विरोध करत आहेत. या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. कारण जर यांना हिंदी नको असेल तर कमाईसाठी तामिळ चित्रपटांना हिंदीमध्ये का डब करतात. त्यांना बॉलिवूडचा पैसा हवा असतो, मात्र हिंदीचा स्वीकार करण्यास मात्र ते नकार देतात. हा कशाप्रकारचा तर्क आहे? एकीकडे उत्तर प्रदेश, बिहारमधून मजूर बोलवायचे, मात्र दुसरीकडे त्यांची भाषा स्वीकारण्यास नकार द्यायचा, ही बाब अयोग्य आहे, असा टोला पवन कल्याण यांनी लगावला.