रश्मिका मंदानाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान विजय देवरकोंडाने दिली नात्याची कबुली, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 12:53 PM2024-11-21T12:53:35+5:302024-11-21T12:55:19+5:30
विजयने तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं कन्फर्म केलं आहे.
Vijay Deverakonda Confirms Relationship : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि रुमर्ड कपल म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. ते दोघं गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. मात्र या दोघांनी वारंवार या चर्चा फेटाळल्या आहेत. आता पुन्हा एकदा रश्मिका आणि विजयच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे. यामागचं कारण म्हणजे विजयने तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं कन्फर्म केलं आहे.
विजय देवरकोंडानं नुकतंच 'कर्ली टेल्स'ला मुलाखत दिली. यावेळी लव्ह लाईफबद्द बोलताना डेट करत असल्याचं त्याने सांगितलं. विजय म्हणाला, "प्रेमात पडताना कसं वाटतं हे मला माहीत आहे. पण, बिनशर्त प्रेम माहित नाही. कारण प्रेम अपेक्षांसह येते. त्यामुळे माझे प्रेम बिनशर्त नाही".
पुढे तो म्हणाला, "मला वाटतं सगळंच ओव्हर-रोमँटिक झालंय. बिनशर्त प्रेमाची अपेक्षा करणे योग्य आहे की नाही हे देखील मला माहित नाही. विजयने खुलासा केला की तो त्याच्या एका सह-अभिनेत्रीला डेट करत आहे. तो म्हणाला, "मी डेटवर जात नाही. एखाद्याला खूप दिवसांपासून ओळखून आणि मैत्री करूनच मी बाहेर जातो. मी ३५ वर्षांचा आहे, मी सिंगल राहीन असे तुम्हाला वाटते का?". विजय देवराकोंडा लग्नाबाबत म्हणाला, "लग्न करणे हे महिलांसाठी खूप आव्हानात्मक आहे. लग्न एखाद्याच्या करिअरच्या आड येऊ नये".
विजयच्या प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे अनेक उत्तम चित्रपट आहेत. यामध्ये तेलुगू चित्रपट 'VD12' आणि 'जेजीएम-जण गण मन' या पुरी जगन्नाथ यांच्यासोबतच्या चित्रपटांचा समावेश आहे. विजय आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाध दुसऱ्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. याआधी या जोडीने 'लायगर' चित्रपटात एकत्र काम केले होते. पण, हा चित्रपट फ्लॉप झाला होता. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होती.