दाक्षिणात्य सुपरस्टार Mahesh Babu च्या वडिलांचं निधन, २ महिन्यांपूर्वीच आईनंही घेतला होता जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:28 AM2022-11-15T08:28:48+5:302022-11-15T08:29:40+5:30
महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचं मंगळवारी निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टमनेनी यांचे मंगळवारी निधन झाले. महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी हे सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेते होते. सुपरस्टार कृष्णा म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी पहाटे ४ वाजता हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कृष्णा घट्टमनेंनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला आहे. कृष्णा घट्टमनेंनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. महेश बाबूच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाच्या वृत्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
२ महिन्यांपूर्वी आईचे निधन
दोन महिन्यांपूर्वीच महेश बाबूच्या आईचं निधन झालं होतं. त्या दु:खातून बाहेर येत नाही, तोवर महेश बाबू आणि कुटुंबीयांवर आणखी एक दु:खाचा डोंगर कोसळला. महेश बाबू सातत्याने आपल्या कुटुंबीयांसोबत सोशल मीडियावर फोटोही शेअर करत होता.
कोण होते कृष्णा घट्टामनेनी?
महेश बाबूचे वडील तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. त्यांना कृष्णा या नावाने ओळखलं जायचं. ते अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि राजकारणीही होते. त्यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत तब्बल ३५० चित्रपट केलेल होते. त्यांचा पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला होता. १९६१ मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती.