अमिताभ बच्चन आणि कोटाची बटणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 08:05 AM2022-02-26T08:05:46+5:302022-02-26T08:06:22+5:30

"ते एकदम हसले आणि म्हणाले, बढीया बात उठायी आपने! देखिये, ये हमारी बिझिनेस ट्रीक है..."

spacial article on actor amitabh bachchan Kaun Banega Crorepati how he prepares and does his work | अमिताभ बच्चन आणि कोटाची बटणे

अमिताभ बच्चन आणि कोटाची बटणे

सुधीर गाडगीळ, ख्यातनाम लेखक, संवादक

एका राजकीय नेत्याबरोबर एकदा ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर गेलो होतो. तिथल्या शूटिंगच्या धावपळीत अमिताभ बच्चन यांच्याबरोबर थोड्या गप्पा करण्याची संधी मिळाली. माझ्या नशिबाने आजुबाजूला माझा एक चाहता होता, त्याने बच्चन साहेबांशी माझी ओळख करून दिली. वरून हेही सांगितलं, की गाडगीळ मराठीतले फार प्रसिध्द सूत्रसंचालक आहेत. यांनी त्या जुन्या काळात हातातली नोकरी सोडून सूत्रसंचालनाचा पेशा स्वीकारला होता वगैरे...

मी थोडा कसनुसा झालो. पण बच्चन साहेब नीट कान देऊन ऐकत होते. 

मला म्हणाले, अरे, तो आप हमारेसे भी सिनिअर अँकर हो! क्या बात है! 

- मी पुन्हा कसनुसा होत त्यांना म्हणालो, अगर आप बुरा ना माने तो एक पूछना चाहूंगा! 

ते मला म्हणाले, विचारा विचारा! त्यासाठी परवानगी कशाला घेता? 

मी जमेल तितक्या उत्तम हिंदीत त्यांना विचारलं, कौन बनेगा करोडपतीच्या प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्ही खुर्चीतून उभे राहता आणि प्रकाशझोताच्या दिशेने चालत जाता. त्या चालण्यात एक अभिजात नम्रता आहे आणि तरीही रुबाब आहे, आत्मविश्वास आहे. हे अंगभूत आहे, की सूत्रसंचालनासाठी म्हणून तुम्ही मुद्दाम बारकाईने आत्मसात केलेली काही खास लकब आहे? 

- ते एकदम हसले आणि म्हणाले, बढीया बात उठायी आपने! देखिये, ये हमारी बिझिनेस ट्रीक है! असं पाहा, मी खुर्चीतून उभा राहता राहता पोटाशी हात घेऊन माझ्या कोटाची बटणं खुली करत उभा राहतो आणि चालायला लागलो, की तीच बटणं एकेक करून लावत लावत एकेक पाऊल टाकतो. त्यामुळे माझ्या हातांना एक कृती करण्याची संधी मिळते. नाही तर उंची जास्त असलेल्या माणसाचे हात चालताना खाली लोंबकळल्यासारखे दिसतात आणि ते कॅमेऱ्यासमोर फार वाईट दिसतं. शिवाय उभं राहिल्यावर कोटाची बटणं लावण्यासाठी दोन्ही हात कोपरातून दुमडले गेले, की खांदे आपोआप ताठ होतात आणि तरीही ती बॉडी लँग्वेज उध्दट दिसत नाही! एक सिम्पलसी ट्रीक है, बस!’’ 

- ते हसत हसत पुढल्या शॉटसाठी रवाना झाले आणि मी थक्क होऊन लोकप्रियतेच्या शिखरावरल्या त्या सर्व अर्थांनी  ‘उंच’ माणसाकडे पाहत राहिलो! 

Web Title: spacial article on actor amitabh bachchan Kaun Banega Crorepati how he prepares and does his work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.