विशेष मुलाखत : माणसं प्रेम करतात, घर बांधतात; ते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 07:35 AM2021-12-18T07:35:40+5:302021-12-18T07:35:46+5:30
कविता अचानक आतून येते तेव्हा वाटतं, हे तर शब्दही माझे नाहीत, कुठून आले? कोण मार्ग दाखवतं? बोलतं? अंतर्मनात कुणीतरी बसलंय का?
जितेंद्र जोशी, ख्यातनाम कलाकार
‘गोदावरी’मधील निशिकांतच्या भूमिकेसाठी नुकताच अभिनयाचा ‘रजत मयूर’ मिळाला. त्या नायकासारखं ‘अडकून पडल्या’ची तगमग तुम्ही कधी अनुभवलीय?
मला जसा चित्रपट बघायला आवडेल तशा चित्रपटाची निर्मिती करण्यापर्यंत मी आज पोहोचलो आहे, पण, मुंबईला आलो होतो ते अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यापोटी. एकदा ती सुरक्षितता मिळाल्यावर आपल्या घरादारातील प्रतिमेकडे, ओळखीकडे, नव्या संधींकडे आपसूकच लक्ष जायला लागलं. सगळं मिळत गेल्यावर एका टप्प्यानंतर आपल्याला एखाद्या पात्रातून किंवा कवितेतून जो काही शोध घ्यायचाय, जे सांगायचंय ते बारकाईनं करता येतंय का, याकडं बघणं व्हायला लागलं. वेगवेगळ्या टप्प्यावर अस्वस्थता बदलत गेली. भूक बदलत गेली. या व्यवसायाच्या रूपामुळे परत परत तेच ते काम करायची वेळ अनेकदा येते. इतकी माणसं इतक्या तऱ्हेचे चित्रपट बनवतात, त्यात आपण स्वत:ला नक्की कुठं बसवतो याचाही एक झगडा लागलेला असतो.
कधीकधी मग, तुम्ही निवड करायला लागता, कधी ते सहज नसतं - आणि मग, पुन्हा माणूस अन्न,वस्त्र,निवारा या गरजांपाशी येऊन पोहोचतो. राग यायला लागतो. आदळआपट होते. थकायला होतं. ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येते. आपलं काय चाललंय असा प्रश्न भेडसावतो. काहीजण त्या स्थितीशी जुळवून घेत संबंधित कामातून नाव, पैसा, संबंध कमावतात. जसजसं वय, अनुभव वाढत जातो तसं स्वत:च्या, इतरांच्या अनुभवातून, कलाकृतीतून, पुस्तकातून तुमच्या मूळ असण्याला एक सघनता मिळत जाते. चूक-बरोबर, योग्य-अयोग्य, अनुकूल-प्रतिकूल गोष्टी तयार होत राहातात. एकूण जगण्याच्या परिघातून लसावि मसावि काढत एक गणित मांडलं जातं. त्या गणितातून तुम्हाला नवीन कविता शोधता येते का, काही नवा अर्थ सापडतो का, विचारांची दिशा कळतेय का, हे उलगडतं. कंटाळा, थकलेपण हा कुठल्याही कामाचा अविभाज्य भाग आहे. त्यावेळी स्वत:ला ओढून, प्रयत्नपूर्वक तुम्ही बांधून ठेवू शकलात की, गोष्टी बदलतात. मी कुठल्याही टप्प्याला नावं देत नाही ‘मायापुरी’ मासिकाच्या आकर्षणातून मी ग्रंथालयाची पायरी चढलो, ‘कऱ्हेचे पाणी’ पर्यंत पोहोचलो. कंटाळ्यातून काय जन्माला येतं ते, बघायला पाहिजे. माझी उठबस ज्या माणसांमध्ये होते, मित्रमंडळी ज्या तऱ्हेची असतात त्यानं मला काहीसा आकार येतो. आलाय. चार मित्रांपैकी तीन जण दोन-तीन-पाच अशी पुस्तकं वाचतात. चौथा काहीच वाचत नाही. पण, तो त्यांच्यासोबत असतो तेव्हा त्यानं ती दहा पुस्तकं वाचलेली असतात, ऐकण्याची तयारी असेल तर ! तगमगीवरही तेच उत्तर.
गोदावरीला अर्घ्य देऊन चित्रपटाचा निश्चय बोलून दाखवलात, तुम्ही श्रद्धाळू आहात?
माझी सद्बुद्धी, चिकाटी हे मला फक्त माझ्या आईबापाकडून मिळालेलं नाही, होय ना?, निसर्गात कुठली तरी अदृश्य शक्ती असते, जी माझ्यावर लक्ष ठेवून असते असं मला वाटतं. नाहीतर माझ्यापेक्षा अत्यंत हुषार, गुणी, दर्जेदार माणसं या क्षेत्रात आहेत, मग, मला हे सगळं मिळण्यामागचं कारण काय?, माझ्याकडे जे पोहोचतं ते कुठून याचं तार्किक उत्तर मिळत नाही तेव्हा मी सगळं निसर्गाच्या हवाली करून टाकतो. त्या अर्थी मी श्रद्धाळू आहे. लहानपणचं वातावरण, संस्कार यामुळं देवाशी माझ्या सतत कुरबुरी चालू असतात. पण, कविता अचानकपणे माझ्यातून येते तेव्हा वाटतं, हे तर शब्दही माझे नाहीत, कुठून आले?, कोण मार्ग दाखवतं?, बोलतं?, अंतर्मनात कुणीतरी बसलंय का?, कुठल्याही गुंत्यात अडकलो असताना कुणीतरी अकल्पितपणे समोर येऊन तोडगा सुचवून जातं, सकाळी उठल्यावर एखाद्या माणसाचा विचार चालू असतो आणि अचानक तो भेटतो.
कितीतरी ताण त्रयस्थच कुणी येऊन हलके करून जातं. हे अनाकलनीय आहे. मातीला गाऱ्हाणं घालत शेतकरी खपतो, तिच्या गर्भात बी पेरतो. एक नवा जीव जन्माला येतो. जीव असतो तिथं स्वभाव नसेल का?, झाडांना भावभावना असतात हे वैज्ञानिकांनीही सिद्ध केलंय, तेच पाण्याबाबतीत. म्हणून मी प्रगाढ विश्वासानं गोदावरीशी बोललो ना !
पण, कधीतरी ही श्रद्धा, विश्वास ढळतो... तेव्हा?
माझ्या मते प्रत्येक माणूस आध्यात्मिक असतो. कधी कधी काही माणसं त्यांना काय समजलंय याची उकल करू शकतात. काहींना ते मांडता येत नाही. ज्यांची जगण्यावर श्रद्धा आहे ती सगळी अखेर आध्यात्मिकच असतात. एरवी काही वळणांवर नात्यांचा, कामाचा, पाहाण्याचा, जगण्याच्या पसाऱ्याचा फोलपणा जाणवत असतो... पण, म्हणूनच जगण्याला अर्थ मिळतो की, नाही?, त्या अर्थाच्या शोधात माणसं माणसांना जीव लावतात, प्रेम करतात, घर बांधतात, मुलंबाळं पोटाशी घेतात. समाजाविषयी तळमळ जाणवून कुणी बाबा आमटे मोठं काम उभारतात. कुणाविषयी तरी पोटातून कणव वाटणं, त्याच्या जगण्याच्या सन्मानाविषयी असोशी वाटणं, दुसऱ्याचं आयुष्य समजून हात देणं हे कुठल्या पोथ्यापुराणांमध्ये नाही.
मग, कुठल्या प्रेरणेनं माणसं विछिन्न होतानाही जगण्याच्या छाताडावर पाय रोवून उभी राहात असतील?, समरसून जगण्याच्या गरजेतून व वेडातून निराशा नाहीशी होते. पानं, फुलं, रोज रस्त्यावर दिसणारी कष्टकरी ओळखी-अनोळखीची माणसं हे मळभ उडवून लावतात. आपण नकळतपणे आपल्याला सापडतो. ‘कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?, मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का?’ या ओळी कुठल्यातरी अनुभवातूनच स्फुरतात ! आयुष्याविषयी सकारात्मक किंवा नकारात्मक माणसांनाही अबोध पातळीवर हे जाणवत असतं. नट म्हणून किंवा कवी म्हणून त्या अनुभवांवर मालकी न सांगता मान झुकवून ते घ्यावेत व स्वत:ला सैल करावं हे मला कळतं. ते कळलं की, तुमच्या नसलेल्या गोष्टीही तुम्हाला सापडतात, न दिसणाऱ्या वाटेवर अनाकार स्पर्श होतो.
मुलाखत : सोनाली नवांगुळ