स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’च्या सेटवर यांनी लावली खास हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 06:00 AM2018-11-13T06:00:00+5:302018-11-13T06:00:02+5:30
श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी नुकतीच या मालिकेच्या सेटला भेट दिली.
स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. याच प्रेमाची पोचपावती देणारी एक सुखद घटना नुकतीच घडली. श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी नुकतीच या मालिकेच्या सेटला भेट दिली. दररोज मालिकेमधून दिसणाऱ्या कलाकारांची प्रत्यक्ष भेट होणं हा आनंद त्यांना सुखावणारा होता. त्यासाठी शहापूर ते मढ असा प्रवास करत ही मंडळी सेटवर पोहोचली आणि छोटी मालकीणच्या कलाकारांसोबत एकत्र जेवणाचा आनंद लुटला.
शहापूर जवळील सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील या विद्यार्थीनी ‘छोटी मालकीण’ ही मालिका न चुकता पाहातात. मालिकेवरील याच प्रेमापोटी त्यांनी कलाकारांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. ‘छोटी मालकीण’च्या सेटवर या लाडक्या चाहत्यांचं थाटात स्वागत करण्यात आलं. शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत कलाकारांनीही त्यांच्याशी मनसोक्त संवाद साधला.
‘छोटी मालकीण’ मालिकेतील श्रीधर म्हणजेच अक्षर कोठारीला जेव्हा या खास चाहत्यांबद्दल कळलं, तेव्हा तो खुपच आनंदीत झाला. एरव्ही चाहत्यांना भेटण्याची संधी आम्हा कलाकार मंडळींना खूप कमी वेळा मिळते त्यामुळे माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. ही आठवण मी कॅमेऱ्यात कैद करून ठेवल्याची भावना अक्षरने व्यक्त केली.
छोटी मालकीण' या मालिकेत अक्षरबरोबर एताशा संझगिरी मुख्य भूमिका साकारत आहे. एताशा या मालिकेत 'रेवती' ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. एताशाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत ती डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, निखिलराजे शिर्के, प्रदीप पंडित, प्रतीक्षा जाधव, पूजा नायक अशा अनुभवी कलाकारांबरोबर काम करायला मिळत असल्याने ती प्रचंड खूश आहे.
‘छोटी मालकीण’ या मालिकेची टीम ही एखाद्या कुटुंबासारखीच आहे. या मालिकेच्या सेटवर काही दिवसांपूर्वी मालिकेत अक्षरच्या आईची भूमिका साकारणाऱ्या वंदना वाकनीस यांनी अक्षरसाठी खास पिठले बनवून आणले होते तर मालिकेचा प्रोडक्शन मॅनेजर विशाल मोरेनेही अक्षरसाठी पिठले आणून त्याला खास सरप्राइज दिले होते.
‘छोटी मालकीण’ ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळते.