अर्थाच्या चक्रव्यूहात अडकले गाणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 12:01 PM2022-08-07T12:01:47+5:302022-08-07T12:02:37+5:30
Marathi movie songs: संगीताची मागणी वाढली, पण उत्पन्न कमी?
संजय घावरे
(भाग - एक)
आज नवनवीन मराठी गाणी रसिकांचे मनोरंजन करत आहेत. उदयोन्मुख गायक-संगीतकारसंगीत क्षेत्रात नशीब आजमावत आहेत. पण, संगीतातून मिळणारे उत्पन्न घसरल्याने बऱ्याच जणांची कोंडी झाली आहे. फिल्मी-नॅान फिल्मी संगीताला युट्यूबसह सोशल मीडियाने मदतीचा हात दिला आहे. पण, त्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी अटी पूर्ण करताना संगीत बनवणाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे मागणी वाढली असली तरी उत्पन्न कमी झाल्याचा सूर संगीत क्षेत्रातून आळवला जात आहे.
चित्रपट निर्मात्यांसोबतच गायक-संगीतकारांना पूर्वी कॅसेटस-सीडीद्वारेही उत्पन्न मिळायचे, पण आता ते बंद झाले आहे. कोणी म्युझिक विकत घेत नसल्याने बऱ्याच चित्रपटांची म्युझिक विक्रीच झालेली नाही. सध्याचा म्युझिकचा कारभार ऑनलाईन पद्धतीने चालत आहे. याबद्दलचे परिपूर्ण ज्ञान फार कमी लोकांना असते. मराठी म्युझिक विकत घेणाऱ्या कंपन्यांची संख्या फार कमी आहे. म्युझिकमध्ये काहीजण पैसे कमवत असले तरी याच्या तुलनेत उत्पन्न न मिळणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. वर्षाकाठी अंदाजे १२५ मराठी सिनेमे रिलीज होतात. एका चित्रपटात सरासरी तीन-चार गाणी असल्याचे मानले तरी जवळपास ४५०-५०० गाणी सिनेमांद्वारे येतात. अल्बम्स आणि सिंगल्सची संख्याही खूप आहे. याचे कमर्शिअल मॉडेल मराठीत नीट वर्कआऊट झाले नाही हे दुर्दैव असून याचाच फटका संगीत क्षेत्राला बसत असल्याचे संगीत विश्वातील जाणकार मानतात. महिन्याला सात-आठ नॅान फिल्मी गाणी बनत असून वर्षाकाठी हा आकडा ९०-१०० पर्यंत पोहोचतो. इतक्या मोठ्या प्रमाणात संगीत निर्मिती होऊनही पूर्वीसारखा शाश्वत इन्कमचा मार्ग नाही. 'रंग लागला', 'असा हा धर्मवीर', 'भेटला विठ्ठल', 'खंबीर तू','चंद्रा' या काही फिल्मी गाण्यांसोबतच 'बोल मैं हलगी बजाऊं क्या', 'शांताबाई', 'ओ शेठ', 'आमदार झाल्यासारखं वाटतंय' ही अलिकडच्या काळातील नॉन-फिल्मी गाणी गाजली आहेत.
'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटाचे म्युझिक राईट्स अद्याप विकले गेलेले नाहीत. यावर मनोरंजन वाहिन्या नवीन निर्मात्यांना हेरून भाव पाडून म्युझिक देण्यासाठी दबाव आणत असल्याचे मत 'सरसेनापती हंबीरराव'चे निर्माते धर्मेंद्र बोरा यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, "नवीन निर्माते गाण्यांवर पैसे खर्च करतात, पण संगीत घेणाऱ्या वाहिन्या पैसे न देता मार्केटिंग करून सिनेमा पोहोचवण्याची ऑफर देतात. यासाठी निर्माता तयार झाला नाही तर भाव पाडून संगीताचे हक्क मागतात. 'सरसेनापती हंबीरराव'च्या गाण्यांसाठी खूप खर्च केला, पण संगीत विकताना त्यापैकी ५० टक्केही रक्कम मिळणार नसल्याचे जाणवल्याने संगीत विकले नसल्याचेही", धर्मेद्र म्हणाले.
म्युझिक घेणाऱ्या कंपन्या-वाहिन्या
टी-सिरीज, टीप्स, सारेगमा, ९एक्स, मायबोली, संगीत मराठी, झी चित्रमंदीर, झी म्युझिक, व्हिडीओ पॅलेस, अल्ट्रा मराठी, शेमारू मराठीबाणा, एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट
ऑडिओ स्ट्रीमिंग साईटस-अॅप्स
गाना, स्पॅाटीफाय, सावन, अॅमेझॅान प्राइम म्युझिक, विंक म्युझिक, रेसो, डिझर, हंगामा, पँडोरा, आपले म्युझिक, आय ट्यून्स
१५-२० कोटींच्या आसपास म्युझिक इंडस्ट्रीचा व्यवसाय
४५०-५०० फिल्मी गाणी दरवर्षी बनतात
९०-१०० नॅान फिल्मी गाणी दरवर्षी बनतात
१.५ लाखांपासून पुढे नॅान फिल्मी गाणे विकले जाते
२०-२५ लाखांपर्यंत फिल्मी गाणी विकली जातात
एका गाण्यासाठी खर्च...
१५-२० हजार रुपये वादकाला प्रत्येकी
२०-२५ हजार रुपये गीतकार
२५ हजारांपासून पुढे मराठी गायक-गायिका
१ लाखांच्या पुढे हिंदीतील गायक-गायिका
२०-४० लाख रुपये एका सिनेमाचे म्युझिक बजेट
एका गाण्याला सर्वसाधारणपणे ५ ते १० लाख खर्च, तीन-चार गाण्यांसाठी २५ ते ३० लाख खर्च, १५ ते २० लाखांमध्ये पार्श्वसंगीत, ४० ते ५० लाख रुपये संगीत-पार्श्वसंगीतावर खर्च होतात. रिकव्हरीची खात्री शून्य आहे. इतके पैसे खर्च करून म्युझिक कंपन्यांकडून १० लाखांपेक्षाही कमी ऑफर मिळते. त्यामुळे बरेच निर्माते संगीत विकतच नाहीत. काही निर्माते तडजोड करून कमी खर्चात संगीत बनवतात, पण उत्तम दर्जाचे संगीत बनत नाही.
"मिलियन्स ऑफ व्ह्यूज मिळाल्याशिवाय युट्यूबकडून पैसे मिळत नाहीत. नॉन परफॉर्मिंग लोकांसाठी हे अवघड आहे. स्टेजवर न गाणाऱ्यांसाठी खूप अवघड परिस्थिती आहे. चित्रपटासाठी गाणे केल्यानंतर आम्हाला निर्मात्यांकडून पैसे मिळतात, पण नॉन फिल्मी गाणी बनवणाऱ्यांचे आर्थिक गणित कठीण आहे. काही म्युझिक कंपन्या गाणी रिलीज करण्याच्या बदल्यात सबस्क्राईबर्स द्यायला तयार असतात. २०१५ पासून सुरू असलेला संगीताच्या ट्रान्झिशनचा काळ संगीत क्षेत्रासाठी अवघड आहे. या काळात सर्व फुकट मिळत आहे. गाव पातळीवर बरीच गाणी बनत आहेत, पण गावोगावी जेव्हा एका क्लीकवर गाणे विकत घेतले जाईल, तेव्हा त्यांना फायदा होईल," असं गायक-संगीतकार, दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले.
"कॅसेट्स-सीडीच्या काळात म्युझिकला किंमत होती. आज केवळ चित्रपट संगीताच्या माध्यमातूनच याचे बिझनेस सर्कल पूर्ण होत आहे हा मेजर प्रॉब्लेम आहे. चित्रपटाला संगीत देत नाहीत त्यांच्यासाठी बिझनेस सर्कल पूर्ण होत नसल्याने उत्पन्न मिळत नाही. संगीत मीडियावरून प्रमोट करण्याइतके पैसे त्यांच्याकडे नसतात. सोशल मीडियाचा फायदाही आहे आणि तोटाही. संगीत क्षेत्रातील अर्थकारण चांगले नाही. आज सोशल मीडियामुळे नवोदितांना संधी मिळत आहे. बरेच जण प्रोफाईल्स पाठवतात. त्यातून मनीष राजगिरेसारख्या गायकाला 'विठ्ठला विठ्ठला...' गाणे मिळते. सोशल मीडियामुळे आघाडीच्या संगीतकारांपर्यंत पटकन पोहोचता येत आहे", असं मत संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी मांडलं.
"म्युझिक कंपन्या संगीत करणाऱ्यांची पिळवणूक करत आहेत. संगीतावरील खर्चाच्या तुलनेत निम्मे रिटर्न्सही मिळत नाहीत. आघाडीचे संगीतकार वगळता दुसऱ्या फळीतील संगीतकार हतबल झाले आहेत. म्युझिक कंपन्यांकडे पूर्ण यंत्रणा असल्याने त्यांची दादागिरी वाढली आहे. यासाठीच आम्ही नवीन मुलांना गाणे करण्याची संधी देत आहोत. या गाण्यांचे डिस्ट्रीब्युशन करून ९० टक्के फायदा त्यांना देतो. मोठ्या कंपन्या नवीन मुलांची गाणी लोकांपर्यंत पोहोचू देत नाहीत. युट्यूबवर मोठ्या कंपन्यांची टुकार गाणी अगोदर येतात. त्यांनी ही यंत्रणाही त्यांनी काबीज केली आहे", असं -अजय नाईक (संगीतकार, संचालक - झूम म्युझिक) म्हणाले.