Special article: पॅन इंडियाचा फायदा साऊथला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 04:01 PM2022-08-21T16:01:24+5:302022-08-21T16:02:15+5:30

Special article: हिंदीला वरचढ ठरतोय दक्षिणात्य सिनेमा!

Special article Pan India benefits South cine | Special article: पॅन इंडियाचा फायदा साऊथला

Special article: पॅन इंडियाचा फायदा साऊथला

googlenewsNext

संजय घावरे

आज पॅन इंडियामुळे दक्षिणात्य सिनेमांसाठी जसे देशभरातील मार्केट खुले झाले आहे तसेच हिंदी सिनेमांनाही दक्षिणात्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडला आहे. त्यामुळे दक्षिणात्य सिनेमे देशभर रिलीज होऊ लागले आणि हिंदीतील चित्रपटही साऊथमध्ये पोहोचू लागले, पण याचा फायदा नेमका कोणाला होतोय हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे. पॅन इंडियामुळे दक्षिणात्य चित्रपट देशभरात बिझनेस करून गल्ला भरतोय, पण हिंदी चित्रपटांना मात्र साऊथमध्ये कमाईचे कोडे अद्याप सुटलेले नाही.

आज जवळपास सर्वच बिग बजेट हिंदी सिनेमे तमिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम या साऊथच्या चार भाषांमध्येही रिलीज होत आहेत. याच धोरणांतर्गत दक्षिणेकडील सिनेमेही हिंदीत प्रदर्शित होत आहे. याचा फायदा दोन्ही इंडस्ट्रीला व्हायला हवा, पण तसे होत नाही. कारण अगोदर दक्षिणात्य सिनेमा केवळ तिथल्या प्रेक्षकांपुरताच मर्यादित होता. आता हिंदीत डब होत असल्याने देशभर पोहोचत आहे. महाराष्ट्र त्यांच्यासाठी जणू खुले मैदानच बनले आहे. पॅन इंडियामुळे दक्षिणात्य चित्रपटाचे पॅकेज मोठे झाले, पण हिंदी सिनेमा साऊथममध्ये डब होऊनही लोकल चित्रपटांच्या तुलनेत कमी स्क्रीन्सवर रिलीज होत असल्याने बिझनेस करू शकलेला नाही. तिथे चार स्क्रीन्स असलेल्या मल्टिप्लेक्समध्ये तीन स्क्रीन्स दक्षिणात्य चित्रपटांसाठी राखीव असतात आणि उरलेल्या केवळ एका स्क्रीनवर हिंदी, हॅालीवूडपटांसह इतर चित्रपट प्रदर्शित होतात. त्यामुळे अर्थातच हिंदी सिनेमांचे नुकसान होत आहे. हा चमत्कार मुळीच एका रात्रीत घडलेला नाही. दक्षिणात्य सिनेसृष्टीने दूरदृष्टी ठेवून अत्यंत हुषारीने आणि तिथल्या राज्यकर्त्यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन मोठ्या खुबीने आपल्या सिनेसृष्टीच्या विकासासाठी पायघड्या घातल्या आहेत. त्यामुळे दक्षिणात्य चित्रपटांनी आज केवळ भारतातीलच बाजारपेठ काबीज केली नसून, सीमोल्लंघन करत परदेशी भाषांमध्येही आपला सिनेमा पोहोचवला आहे.

असा तयार केला रोडमॅप...

- पाच-पाच वर्षांच्या दोन टप्प्यांमध्ये साऊथ इंडियन फिल्म्सने यश मिळवले आहे.
- दक्षिणात्य सिनेमे हिंदीत डब करून मनोरंजन वाहिन्यांवर सारखे दाखवले जाऊ लागले.
- सर्वप्रथम हिंदी सिनेमांच्या प्रेक्षकांच्या मनात साऊथच्या सिनेमांनी स्थान निर्माण केले.
- हिंदी-मराठी सिनेमांच्या तुलनेत तिथले सिनेमे कसे ग्रेट आहेत हे ठसवून दिले.
- दक्षिणेकडील राज्यांमध्ये तिथल्या सिनेमांसाठी राखीव स्क्रीन्स कायम ठेवले.
- हिंदीसह इतर सिनेमांची केवळ एक स्क्रीन देऊन बोळवण करण्यात आली.
- हिंदीतील बड्या प्रोडक्शन हाऊसेसद्वारे साऊथचे सिनेमे रिलीज केले गेले.
- हिंदीवाल्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून हिंदी चित्रपटांवर निशाणा साधला.
.............................
देशभरातील सिनेमागृहे १० हजार 
दक्षिणेकडील सिनेमागृहे ६हजार
महाराष्ट्रातील सिनेमागृहे २००-२५०
महाराष्ट्रातील स्क्रीन्स ६५०-७००
------------------------------------

साऊथमध्ये तिकीट दर ३५ रुपयांपासून १००० रुपयांच्याही पुढे
-------------------------------------

दमदार संवाद... जबरदस्त बिझनेस...

'कटप्पाने बाहुबली को क्यों मारा...'- बाहुबली (१८१० कोटी बिझनेस)
'मेरी दोस्ती लायक कोई यार नही, मेरी दुष्मनी झेल सके ऐसी तलवार नही...'- केजीएफ (११९८ कोटी बिझनेस)
'फ्लॅावर समझा क्या, फायर है फायर...'-  पुष्पा (३९८ कोटी बिझनेस)
.......................

१ नंबर - आंध्रप्रदेश-तेलंगणा - टॉलिवूड (तेलुगू)
२ नंबर - तमिळनाडू-चेन्नई - कॉलिवूड (तमिळ)
३ नंबर - कर्नाटक - सँडलवूड (कन्नड)
४ नंबर - केरळ - मॉलिवूड (मल्याळम)
.......................

साऊथच्या यशाचे कॉमन सिक्रेट

दक्षिणात्य लेखक-दिग्दर्शकांनी प्रेक्षकांची नाडी ओळखली आहे. रंजलेल्या-गांजलेल्या समाजातील पेटून उठणारा नायक. सिस्टीमविरोधात बंड करणाऱ्या नायकाला देव मानणारी जनता आणि जोडीला भव्य-दिव्य सादरीकरण. केजीएफ, पुष्पा, जयभीम या सर्वांमध्ये ही समान बाब आहे. इथल्या पहिल्या तीन इंडस्ट्रीज अॅक्शन बेस्ड आहेत. सगळ्यांचा जॅानर जवळपास समान आहे. बिस्ट, कर्णन, जयभीम. सर्वसामान्यांशी रिलेट करणारे सिनेमे आहेत. चांगल्या पटकथेची, धारदार संवादांची, जबरदस्त अॅक्शनची जोड दिल्याने सर्वसामान्यांनाही अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी शक्य वाटू लागल्या.

आपली संस्कृती देशभर पोहोचवली...

साऊथच्या चार भाषांखेरीज हिंदी, भोजपूरी, बंगाली, अवधीत सिनेमांचा प्रेक्षकवर्ग वाढवला. आपली संस्कृती देशातच नव्हे तर परदेशी भाषांमधून जगभर पोहोचवली. याचा परिणाम असा झाला की आता आपल्यालाही हिंदीपेक्षा त्यांचे चित्रपट जवळचे वाटू लागले.

त्यांनी कोटा राखीव ठेवलाय...

साऊथमध्ये त्यांचे सिनेमे लागल्यावर इतर सिनेमांना जागा दिली जाते. त्यांनी आपला कोटा फिक्स करून ठेवलाय, आपण ते केलेले नाही. साऊथचा सिनेमा आला की त्यांना रान मोकळे करून देतो. निर्माते-दिग्दर्शकांसोबतच शासनाचे धोरण आणि मल्टिप्लेक्स मालकांची भूमिकाही महत्त्वाची असते. एखाद्या इंडस्ट्रीचा इतका विकास होतो यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात.

साऊथचे सीमोल्लंघन

तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम सिनेमांनी आपल्या राज्यांच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत. आता त्यांनी देशाबाहेरही आपला प्रेक्षकवर्ग पक्का केला आहे. चायनीज भाषेसह अबेरीक भाषांमध्येही डब झाल्याने तिथे मार्केट निर्माण झाले. जिथे चित्रपटांची संस्कृती नाही तिथे जाणीवपूर्वक आपले सिनेमे नेऊन तिथली बाजारपेठ साऊथने काबीज केली आहे.
......................
- मनोज सुवर्णा (वितरण प्रमुख, ऑगस्ट एन्टरटेन्मेंट)

साऊथचा सिनेमा नॅार्थमध्ये चांगला बिझनेस करत आहे, पण मोठमोठ्या स्टार्सचे हिंदी सिनेमे साऊथमध्ये चालत नाहीत. नुकताच 'कार्तिकेय २' हा तेलुगू सिनेमा रिलीज झाला आहे. 'रक्षाबंधन' आणि 'लाल सिंग चढ्ढा' समोर असतानाही शनिवारपासून 'कार्तिकेय'ने चांगले ओपनिंग मिळवले. रविवारपर्यंत या सिनेमाची डिमांड इतकी वाढली की जिथे 'कार्तिकेय २' नव्हता तिथेही लावावा लागला. त्यामुळे सध्या साऊथची चलती आहे.
 

Web Title: Special article Pan India benefits South cine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.