कोर्ट’ फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या ‘द डिसाइपल’ सिनेमाची ही आहे खासियत, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 02:33 PM2021-05-20T14:33:37+5:302021-05-20T14:34:27+5:30

विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप पाडल्यानंतर ‘कोर्ट’ फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा ‘द डिसायपल’ हा मराठी सिनेमा अखेर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

This is the specialty of Court's fame director Chaitanya Tamhane's movie 'The Discipline', he said ... | कोर्ट’ फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या ‘द डिसाइपल’ सिनेमाची ही आहे खासियत, म्हणाला...

कोर्ट’ फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या ‘द डिसाइपल’ सिनेमाची ही आहे खासियत, म्हणाला...

googlenewsNext

विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप पाडल्यानंतर ‘कोर्ट’ फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा ‘द डिसायपल’ हा मराठी सिनेमा अखेर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ३० एप्रिलला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलिज झाला. या चित्रपटाचा अनुभव नुकताच चैतन्य ताम्हाणेने शेअर केला आहे.


चैतन्य ताम्हाणे म्हणाला की, माझा जन्म मुंबईचा. बालपणही इथलेच. मी इतर कोठेही ‘द डिसाइपल’ बनविण्याचा विचार केला नसता; कारण हे शहर स्वतःच या चित्रपटातील एक पात्र आहे. मी नेहमीच माझ्या चित्रपटांकडे सामाजिक प्रकल्प म्हणून पाहिले आहे. एखादे वातावरण, एखादी विशिष्ट संस्कृती आणि जगण्यातील अस्सल अनुभव दर्शविण्याचा प्रयत्न करताना आपल्याला संपूर्ण समाजाची मदत घ्यावी लागते. चित्रपटातील एखादा अगदी छोटा भागही वास्तविक जगाचा भाग असल्यासारखे आम्हाला दाखवायचे होते. त्या दृष्टीने चित्रपटातील संगीत सभेला उपस्थित असलेला प्रेक्षकही आम्हाला जाणकार आणि दर्दीच हवा होता. साहजिकच, खऱ्या जाणकारांनाच चित्रपटात भूमिका देण्याची गरज होती. 


राज्यातील असंख्य शास्त्रीय संगीतकारांव्यतिरिक्त मुंबई आणि आसपासच्या भागातील शेकडो बँक कर्मचारी, वकील, शिक्षक, रेल्वे कामगार आणि संगीतातील आवड असणारे असे अनेकजण ‘ऑडिशन’साठी पुढे आले. आम्ही चित्रीकरणास सुरवात केली, तेव्हा त्यापैकी बर्‍याच जणांनी आपापल्या कार्यालयांमध्ये अनेक दिवसांची रजा घेतली आणि मैफिलीच्या दृश्यांचे अस्सल वातावरण निर्माण करण्यात, मैफिलींसाठी योग्य जागा शोधण्यात मदत केली; तसेच शहरात चित्रीकरण करायचे असेल, त्यावेळी त्यांनी रस्ते, महामार्ग मोकळे करून देण्याचीही कामे उत्साहाने केल्याचे ताम्हाणेने सांगितले. 


त्याने पुढे म्हटले की, रात्र असो वा दिवस, त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. हा आपला चित्रपट असल्याची त्यांची भावना इतकी उत्कट होती, की माझ्या भोवतालचे सामाजिक वातावरण आणि माझे शहर यांच्याबद्दलच्या कथा मी सांगू शकेन आणि तरीही जागतिक प्रेक्षकवर्गापर्यंत मी पोहोचू शकेन, याचा मला खूप मोठा आत्मविश्वास त्यातून मिळाला. भौगोलिक सीमा आणि भाषा यांचे अडथळे ओलांडून जगभरातील प्रेक्षकांनी ‘द डिसाइपल’चे जंगी स्वागत केले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा आनंद सोहळा माझ्या एकट्याच्या किंवा चित्रपटासाठी काम केलेल्यांच्या मालकीचा नाही, तर शहरातील त्या सर्व अदृश्य नायकांचा आहे, ज्यांनी आम्हाला या प्रयत्नात यश दिले. 


‘द डिसाइपल’ हा तथाकथित ‘प्रादेशिक’ मराठी चित्रपट आहे. ‘कोर्ट’नंतर माझा पुढचा चित्रपट हिंदीमध्ये येणार का, अशी अनेकांनी चैतन्य ताम्हाणेला विचारणा केली होती, त्यावर तो म्हणाला की, आम्ही ‘द डिसाइपल’ मराठीत बनविला, कारण या चित्रपटाच्या बर्‍याच पात्रांसाठी मराठी ही योग्य भाषा होती. चित्रपटात असे काही भाग आहेत, ज्यात पात्रांसाठी किंवा त्यातील परिस्थितीसाठी वेगळ्या भाषेची गरज निर्माण झाली; तिथे आपल्याला हिंदी, इंग्रजी व बंगाली भाषेतील संवाद आढळतील. ‘अ‍ॅकेडमी पारितोषिक’विजेते चित्रपट निर्माते अल्फोन्सो क्वारन यांना मी माझे गुरू मानतो. त्यांनी एकदा मला सांगितले होते, की सिनेमा ही एक वैश्विक भाषा आहे. ‘द डिसाइपल’बरोबरच्या माझ्या अनुभवाने मलाही याची खात्री पटली. 


हा चित्रपट शक्य व्हावा म्हणून गेल्या पाच वर्षांत ज्यांनी प्रचंड कष्ट घेतले, त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. अर्थात, प्रेक्षकांच्या मनाशी भिडल्याशिवाय चित्रपट कधीही पूर्ण होत नाही. आता आमच्या कष्टाचे हे फळ जगासमोर मांडले जात असताना, या चित्रपटातील सांस्कृतिक वैशिष्ट्ये, बारकावे आणि जटिलता यांचे कौतुक करू शकतील, अशांपर्यंत तो पोहोचावा, अशी माझी इच्छा आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रेक्षकवर्गापेक्षा हा लक्ष्यित प्रेक्षकच मला महत्त्वाचा वाटतो. सध्याच्या कठीण परिस्थितीत, माणसाला थोडा आराम, काही दिलासा देऊन त्याला एक समाज म्हणून जवळ आणण्याचे काम कला करीत राहील, अशी प्रामाणिकपणे आशा चैतन्यने व्यक्त केली.

Web Title: This is the specialty of Court's fame director Chaitanya Tamhane's movie 'The Discipline', he said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.