श्रीदेवी यांनी विमानातच सोडला होता करवा चौथचा उपवास, पायलटला म्हणाल्या, 'मला चंद्र...'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 01:11 PM2023-02-24T13:11:11+5:302023-02-24T13:13:06+5:30
एका सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रीदेवी पतीसह विमानातून प्रवास करत होत्या.
अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची आज पाचवी पुण्यतिथी. त्या बॉलिवूडमधल्या सर्वात आघाडीच्या आणि लोकप्रिय अभिनेत्री होत्या. श्रीदेवी चित्रपटात असणार म्हणजे सिनेमा हिट होणारच असाच विश्वास सर्व निर्मात्यांना असायचा. लोकप्रियतेच्या उच्चशिखरावर असतानाच श्रीदेवीला निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी 'मिस्टर इंडिया' हा सिनेमा ऑफर केला. तेव्हापासूनच दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. बोनी कपूर श्रीदेवी यांना पाहताक्षणीच प्रेमात पडले होते. तर श्रीदेवीही बोनी यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. दोघांचे प्रेम इतके की लग्नानंतर एके दिवशी करवा चौथला श्रीदेवी यांनी पायलटला विमानाची दिशाच बदलायची विनंती केली होती. कारण त्यांना चंद्राकडे बघून उपास सोडायचा होता. काय आहे हा गजब किस्सा.
करवा चौथच्या दिवशी महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. दिवसभर उपास करुन रात्री चंद्राकडे बघितल्यानंतर पतीच्या हाताने पाणी आणि अन्नाचा घास घेत उपास सोडतात. श्रीदेवी देखील खाजगी आयुष्यात या सर्व गोष्टी पाळत होत्या. एका सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रीदेवी पतीसह विमानातून प्रवास करत होत्या. त्या दिवशी त्यांचे करवा चौथचे व्रत होते. बोनी कपूर सोबत होते, विमानात पाणी आणि खायलाही होते मात्र चंद्राकडे आधी बघायचे असा श्रीदेवी यांचा हट्ट होता. मग काय श्रीदेवी यांनी पायलटला अशा काही विनंती केली की शेवटी पायलटलाही त्यांचे ऐकावे लागले. त्या पायलटला म्हणाल्या,'कृपया तुम्ही विमानाला अशा दिशेने फिरवू शकता का जिथून मला चंद्र नीट दिसेल.'
श्रीदेवी यांची ही विनंती ऐकून पायलटनेही होकार दिला. आकाशात विमान असताना ते काही काळासाठी खास श्रीदेवी यांच्या विनंतीमुळे असे फिरवले गेले की त्यांना चंद्र स्पष्ट दिसेल. अखेर त्यांना चंद्र दिसलाच आणि नंतर श्रीदेवी यांनी पाणी पित उपवास सोडला. श्रीदेवी यांचा हा किस्सा नंतर सर्वांना समजला. आजही हा किस्सा व्हायरल होतो.
श्रीदेवी यांच्या आठवणीत पती बोनी कपूर भावूक, पत्नीसोबतचा पहिला अन् शेवटचा फोटो केला पोस्ट
२४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांचे दुबईत अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला. २०१७ मध्ये आलेला 'मॉम' हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. श्रीदेवी यांनी संपूर्ण कारकिर्दीत 'चॉंदनी', 'सदमा', 'सीता और गीता', 'चालबाज', 'मिस्टर इंडिया' असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.