Ss Rajamouli : काय सांगता? ऑस्कर सोहळ्याच्या प्रत्येक तिकिटासाठी राजमौलींना मोजावे लागले ‘इतके’ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 01:07 PM2023-03-19T13:07:43+5:302023-03-19T13:11:13+5:30
S S Rajamouli, Oscars 2023 : ऑस्कर सोहळ्याला राजमौली, शिवाय रामचरण, ज्युनिअर एनटीआर सगळेच हजर होते. अर्थात यासाठी त्यांना भलीमोठी रक्कम मोजावी लागलेली...
एस. एस. राजमौलींच्या ( S S Rajamouli ) ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानं ऑस्कर जिंकला तेव्हा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. ऑस्कर सोहळ्याला राजमौली, शिवाय रामचरण ( Ram Charan), ज्युनिअर एनटीआर (Jr NTR ) सगळेच हजर होते. अर्थात यासाठी त्यांना भलीमोठी रक्कम मोजावी लागलेली.
एस एस राजामौली आणि त्यांचे कुटुंबीय हजर होते. शिवाय ‘नाटू नाटू’चे गीतकार चंद्रा बोस, संगीतकार एम. एम. कीरावानी, ‘नाटू नाटू’चे दोन्ही कलाकार ज्युनियर एनटीआर, त्याची पत्नी आणि राम चरण, त्याची पत्नी असे सगळे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सामील झाले होते. पण या सर्वांना ऑस्कर एंट्री मोफत नव्हती. अगदी राजमौली, रामचरण, ज्युनिअर एनटीआर यांनाही मोफत तिकिट दिलं गेलं नव्हतं. फक्त चंद्रबोस, एमएम कीरावानी आणि त्यांच्या पत्नींना फ्री एन्ट्री दिली गेली होती. कारण अकादमी पुरस्कारांनुसार, केवळ पुरस्कार विजेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना कार्यक्रमाची मोफत तिकिटं मिळतात. उर्वरित सगळ्यांना ऑस्कर सोहळ्यांचं तिकिट खरेदी करावं लागलं आणि लाखो रुपये मोजावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार एसएस राजामौली यांनी प्रत्येक तिकिटासाठी स्वतःच्या खिशातून पैसे दिले. ऑस्कर अवॉर्ड पाहण्यासाठी राजामौली यांना प्रत्येक तिकिटासाठी २५ हजार डॉलर्स म्हणजे सुमारे २० लाख मोजावे लागलेत.
ऑस्कर सोहळ्यात एस एस राजमौली, रामचरण, ज्युनिअर एनटीआर असे सगळे मागच्या पंक्तीत बसलेले दिसले होते. या सोहळ्यात राजमौलींना समोरच्या रांगेत स्थान न दिल्याबद्दल अनेक भारतीय चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाना होता. कार्यक्रमादरम्यान आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांच्या कुटुंबाला सर्वात मागची सीट देण्यात आली होती. यावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अनेक चाहत्यांनी ऑस्कर सोहळ्याच्या आयोजकांना आसन व्यवस्थेवरुन फटकारलं होतं. ज्या चित्रपटाच्या गाण्याने ऑस्कर जिंकला आहे त्या चित्रपटाच्या टीमला शेवटच्या रांगेत बसवणे हा त्यांचा अनादर असल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली होती.