विद्यार्थी, राजकारण आणि चित्रपट
By Admin | Published: February 20, 2016 01:23 AM2016-02-20T01:23:45+5:302016-02-20T01:23:45+5:30
दिल्लीचे जेएनयू कॉलेज सध्या खूप चर्चेत आहे. या प्रकरणावरून विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक दुफळी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता .
दिल्लीचे जेएनयू कॉलेज सध्या खूप चर्चेत आहे. या प्रकरणावरून विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक दुफळी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता बॉलीवूडमध्येदेखील समर्थन-विरोधाचे वातावरण तापायला लागले आहे. जेएनयूच्या आताच्या वादामुळे कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या राजकारणाचा विषयही ऐरणीवर आला आहे. राजकारणावर आधारित अनेक चित्रपट पडद्यावर झळकले आहेत, ज्यात विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका, त्यात राजकीय पक्षांचे हस्तक्षेप, गुंडागर्दी, नेतागिरीचे दाहक चित्रण करण्यात आले आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या राजकारणावरून बनलेला पहिला चित्रपट जो चर्चेत राहिला तो होता गुलजार यांचा ‘मेरे अपने़,’ ज्यात विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हाने कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अशा विद्यार्थ्यांची भूमिका साकारली होती, जे नेहमी समोरासमोर राहतात आणि हिंसेसाठी सदैव तयार असतात. या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हाचा डायलॉग - ‘श्याम (विनोद खन्ना) आए, तो उससे कह देना की छेनू (शत्रुघ्न सिन्हा) आया था’ अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटात विद्यार्थी राजकारणाच्या अनेक पैलूंना स्पर्श करण्यात आला होता. या चित्रपटाच्या काही वर्षांनंतर हैदराबादहून आलेले युवा निर्देशक रामगोपाल वर्माचा पहिला हिंदी चित्रपट ‘शिवा’ने अवघ्या देशाला अस्वस्थ केले होते. या चित्रपटात कॉलेजच्या एका सामान्य विद्यार्थ्याला तेथील राजकारण आणि गुंडागर्दीशी कसे जोडले जाते, याचे चित्रण होते. विशेष म्हणजे या चित्रपटात कॉलेजमध्ये होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणारे राजकीय पक्ष आणि नेत्यांंपासून ते अपराधी संघटनांपर्यंत अनेकांचे चेहरे उघड करण्यात आले होते. ‘शिवा’नंतर या यादीत मणिरत्नमचा चित्रपट ‘युवा’चे नाव येते़ यात अजय देवगन एका कॉलेज लीडरच्या भूमिकेत दिसला होता. अनुराग कश्यपच्या ‘गुलाल’ चित्रपटातही कॉलेजमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी कसे हातखंडे वापरले जातात आणि त्यांचे राजकीय पक्षाशी संबंध कसे प्रस्थापित होतात, हे दर्शविण्यात आले होते. आनंद एल़ रॉयचा चित्रपट ‘राझंणा’मध्ये बनारसची प्रेमकथा होती तर दिल्लीच्या विद्यार्थ्यांचे राजकारणदेखील होते. अभय देओलने या चित्रपटात विद्यार्थी संघटनेच्या नेत्याची भूमिका केली होती.