Subodh Bhave Birthday : एकेकाळी अभिनय येत नाही म्हणून नाटकातून काढलेला ‘तो’ मराठीचा सुपरस्टार झाला...! नाव सुबोध भावे!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 08:00 AM2021-11-09T08:00:00+5:302021-11-09T08:00:07+5:30
Subodh Bhave Birthday : मालिकांपासून चित्रपटांपर्यंत, अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत विविध क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. आज सुबोध भावेचा वाढदिवस.
मालिकांपासून चित्रपटांपर्यंत अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत विविध क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave). आज सुबोध भावेचा वाढदिवस. 9 नोव्हेंबर 1975 साली पुण्यामध्ये त्याचा जन्म झाला. (Subodh Bhave Birthday)
सुबोध उत्तम अभिनेता. पण अभिनेता म्हणून सिद्ध केल्यानंतर तो कथाकार झाला, दिग्दर्शक झाला. नटश्रेष्ठ बालगंधर्व यांचं हिमालया एवढं उत्तुंग व्यक्तिमत्त्व सुबोधनं पडद्यावर लिलया उभ केलं. ‘ ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटामध्ये त्याने काशीनाथ घाणेकर यांची भूमिका अतिशय समर्थपणे साकारली. आज सुबोधची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. पण कधीकाळी याच सुबोधला अभिनय जमत नाही म्हणून नाटकातून काढून टाकलं होतं.
खरं तर शाळेत असताना अभिनय करू असा विचार सुबोधनं स्वप्नातही केला नव्हता. शाळेच्या गॅदरिंगमध्ये तो दिसायचा. पण फक्त गॅदरिंगच्या तयारीसाठी क्लास बंक केला तरी चालतो म्हणून. शाळा संपली आणि 11-12 वी साठी सुबोधनं सायन्समध्ये अॅडमिशन घेतलं. खरं तर फक्त मित्रांनी सायन्स घेतलं म्हणून तोही विज्ञान शाखेत दाखल झाला. मग काय, 12 वीत सुबोध नापास झाला. पण यातून एक धडा मात्र तो शिकला. तो म्हणजे, कितीही अपयश आलं तरी घाबरायचं नाही.
12 वी सायन्स पास झाला असता तर सुबोधनं कदाचित मित्र करतात म्हणून बीएस्सी वा बीई केलं असतं. पण नापास झाला आणि पुढे कॉमर्समधून तो 12 वी पास झाला. बी. कॉम करण्यासाठी त्यानं पुण्याच्या सिम्बॉयसीस कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं आणि इथूनच त्याच्या अभिनयाच्या प्रवासाला एकार्थाने सुरूवात झाली.
कॉलेजच्या दिवसातही अभिनयाचा अ की ढ कळत नव्हता. म्हणून खूपदा त्याला नाटकातून वगळण्यात आलं. पण हळूहळू नाटकाची अशी काही गोडी लागली की नाटक आणि अभिनय सुबोधच्या रक्तात भिणला. नाटक करता करता एक नोकरी त्याने पत्करली. 9 ते 6 नोकरी आणि 6 नंतर नाटक असा रोजचा त्याचा दैनंदिन कार्यक्रम ठरलेला असायचा. पण ही दुहेरी कसरत फार काळ चालणारी नव्हती. नोकरी की नाटक यापैकी एक निवड करायची होती आणि ही निवड कठीण होती. पण अखेर निर्णय पक्का झाला आणि नाटकासाठी सुबोधनं नोकरीचा राजीनामा दिला.
मला फक्त दोन वर्ष द्या, असं घरच्यांना सांगून तो अभिनयाकडे वळला. पण पहिली सहा महिने काम न मिळाल्याने हताश झाला. छोट्या भूमिकांनी समाधान होईना. पुन्हा नोकरीकडे वळावं का? या द्विधामन:स्थितीत असतानाच तो एका मालिकेच्या आॅडिशनसाठी गेला आणि सिलेक्ट झाला. या मालिकेचं नाव होतं ‘आभाळमाया’.
या पहिल्या मालिकेतून सुबोध घराघरांत पोहोचला आणि मग मात्र त्यानं कधीच मागे वळून बघितलं नाही.