मराठी सिनेमांचं यश वाखाणण्याजोगं
By Admin | Published: June 7, 2017 02:40 AM2017-06-07T02:40:46+5:302017-06-07T02:40:46+5:30
मराठी सिनेमा सध्या चांगली कामगिरी करत असून त्यांचं यश नक्कीच साऱ्यांनीच वाखाणण्याजोगं असल्याचं अभिनेता प्रवीण दबासनं म्हटलं आहे.
-सुवर्णा जैन
मराठी सिनेमा सध्या चांगली कामगिरी करत असून त्यांचं यश नक्कीच साऱ्यांनीच वाखाणण्याजोगं असल्याचं अभिनेता प्रवीण दबासनं म्हटलं आहे. त्याची भूमिका असलेला "मिरर इमेज" हा थ्रीलर सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. याच निमित्ताने त्याच्याशी साधलेला हा संवाद...
मिरर इमेज या सिनेमातील तुझ्या भूमिकेतही नक्कीच काहीतरी स्पेशल असणार, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल?
- या सिनेमात माझ्या पत्नीला माझ्यापासून दूर जायचं असतं, मात्र मी तिला काही करून सोडू शकत नाही. माझ्या पत्नीला मी समजू शकलेलो नाही. तिला काय हवं, काय नको, तिला माझ्यापासून दूर का जायचंय, याचं कारणही मी शोधू शकलो नाही, अशी गुंतागुंत या सिनेमात रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. याआधी मी ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या सिनेमात काम केलं आहे. या सिनेमात मी मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका साकारली होती. यात अनुपम खेर मानसोपचार तज्ज्ञासह बसतात, चर्चा करतात. अनुपम खेर साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला पत्नीपासून अडचण असते. आता या सिनेमाच्यानिमित्ताने मी सुद्धा अशीच काहीशी भूमिका साकारत आहे. त्यावेळी मला बिल्कूल कल्पना नव्हती की, मैंने गांधी को नहीं मारामध्ये अनुपमजी साकारत असलेल्या भूमिकेसारखी भूमिका भविष्यात मी सुद्धा कधी तरी साकारेन. त्या गोष्टींचा मला आता भूमिका साकारताना फायदा झाला.
सिनेमाची स्क्रीप्ट निवडताना तू कोणत्या गोष्टींचा विचार करतो?
- मला दिग्दर्शक विजीत शर्मा यांचा फोन आला. त्यानंतर त्यांनी दाखवलेली स्क्रीप्ट मला लगेच भावली. त्यात जास्त विचार करण्यासारखं काहीही नव्हतं. त्यामुळे होकार दिला. स्क्रीप्ट वाचता वाचता त्यातील व्यक्तिरेखा माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. त्याचवेळी ही कथा चांगली वाटली आणि होकार दिला. मला बऱ्याचदा भली मोठी स्क्रीप्ट पाठवली जाते. एवढी मोठी स्क्रीप्ट वाचून काढणं शक्य नसतं. त्यामुळे सर्वसाधारणपणे मी कोणत्याही स्क्रीप्टची सुरुवातीची दहा पाने वाचतो. कारण हीच दहा पाने महत्त्वाची असतात. त्यावरून एकंदर पूर्ण सिनेमाच्या स्क्रीप्टचा अंदाज येतो. ती दहा पानं आवडली तर मी सिनेमाची निवड करतो अन्यथा सिनेमाला मी नकार देतो. मात्र, मिरर इमेजची स्क्रीप्ट मला भावली आणि मी हा सिनेमा स्वीकारला.
प्रमोशन हे त्या सिनेमाच्या यशासाठी किती महत्त्वाचं असतं?
- गेल्या वर्षी या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. मोठ्या जोमात सिनेमाचं प्रमोशन आम्ही केलं. प्रमोशनसारख्या गोष्टी थोड्या फार थकवा देणाऱ्या असल्या तरी प्रमोशन खूप महत्त्वाचे आहे. कारण एखादा चांगला सिनेमा तुम्ही बनवला आणि तो लोकांना माहिती नसेल तर त्याचा फायदा काय असं मला वाटतं. मिरर इमेज हा सिनेमा थोडा हटके आहे. हा टिपिकल कमर्शियल सिनेमा नाही. यात कोणतंही गाणं नाही. एक गाणं आवडलं तर थांबू असं नाही. त्यामुळे जोवर रसिक सिनेमा हॉलमध्ये जाणार नाहीत तोवर त्यांना सिनेमाचा विषय कळणार नाही. त्यांना सिनेमा हॉलपर्यंत खेचण्यासाठी प्रमोशन गरजेचं आहे.
प्रादेशिक सिनेमा आणि त्यातल्या त्यात मराठी सिनेमांच्या यशाविषयी काय वाटतं?
- प्रियांका चोप्रा प्रादेशिक सिनेमा बनवत आहे. प्रादेशिक सिनेमा सध्या चांगली कामगिरी करत आहेत. मराठी, पंजाबी भाषांमध्ये सिनेमातून चांगले विषय हाताळले जात आहे. खास उल्लेख मराठीचा करावा लागेल. कारण मराठीत वैविध्यपूर्ण सिनेमे येत आहेत. ‘कोर्ट’ हा सिनेमा मी पाहिला आहे. याची कथा मला बरीच भावली. एक उत्कृष्ट विषय संवेदनशील पद्धतीने हाताळला होता. मला ते खूप भावलं. या सिनेमाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. याशिवाय किल्ला हा सिनेमाही मी पाहिला आहे. अमृता सुभाषसह मी कामसुद्धा केलं आहे. राष्ट्रीय पुरस्काराच्या बोर्डाच्या पॅनेलवर मी होतो. त्यामुळे मला त्याबाबत माहीत आहे. मराठी सिनेमा पाहायला मला आवडतो. हे सिनेमे चांगली कामगिरी करीत आहेत. मराठीत दिग्दर्शक हा सुद्धा एक चांगला अभिनेता असतो. त्यामुळे ही एक वेगळी गोष्ट असं मला वाटते.