सिंग बॉक्स आॅफिसवर यशस्वी

By Admin | Published: October 6, 2015 12:02 AM2015-10-06T00:02:07+5:302015-10-06T00:02:07+5:30

अक्षय कुमारचा ‘सिंग’ अवतार पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला. ‘सिंग इज किंग’च्या धाटणीवरील ‘सिंग इज ब्लिंग’ने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त सुरुवात करून पहिल्याच

Successful at Sing Box Office | सिंग बॉक्स आॅफिसवर यशस्वी

सिंग बॉक्स आॅफिसवर यशस्वी

googlenewsNext

अक्षय कुमारचा ‘सिंग’ अवतार पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला. ‘सिंग इज किंग’च्या धाटणीवरील ‘सिंग इज ब्लिंग’ने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त सुरुवात करून पहिल्याच दिवशी २० कोटींहून अधिक कमाई करीत धमाल केली. शनिवारी या चित्रपटाने १४ कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला. रविवारीही जवळपास २० कोटी कमावले. पहिल्याच आठवड्यात ५४ कोटींचा व्यवसाय करीत बॉक्स आॅफिस सर केले. कमाईच्या दृष्टीने अक्षय कुमारचा हा सर्वांत मोठा चित्रपट होय.
प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटातील विनोदाच्या पेरणीमुळे या चित्रपटाने प्रेक्षकांचे पैसावसूल मनोरंजन केले. सोमवारीही चित्रपटाची स्थिती भक्कम होती. त्यामुळे हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्याची शक्यता दिसते.
बहुचर्चित आरुषी हत्याकांडावरील मेघना गुलजारच्या ‘तलवार’ला सरासरी यश मिळाले. पहिल्या तीन दिवसांत ‘तलवार’ने
९ कोटींचा व्यवसाय केला. गंभीर चित्रपटांच्या चाहत्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला. इरफान खान आणि कोंकणा सेन-शर्मा यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक या चित्रपटाकडे आकर्षित झाले. शुक्रवारी ‘पुली’ प्रदर्शित झाला. हिंदी भाषेच्या प्रतिरूपातील या चित्रपटात श्रीदेवी आणि श्रुती हसनशिवाय साऊथचा बडा स्टार विजय असतानाही हिंदी प्रेक्षकांच्या पसंतीला हा चित्रपट उतरला नाही. बाहुबलीच्या धर्तीवर बनविण्यात आलेल्या या चित्रपटाला दक्षिण भारतात मात्र जोरदार यश मिळाले. तथापि, हिंदीतील ‘पुली’ प्रेक्षकांना फारसा भावला नाही.
याआधी प्रदर्शित झालेल्या मधुर भंडारकर यांचा ‘कॅलेंडर गर्ल्स’ बॉक्स आॅफिसवर टिकला नाही. १० दिवसांत या चित्रपटाची कमाई जवळपास ६ कोटी राहिली. हास्य अभिनेता कपिल शर्माच्या ‘किस किस को प्यार करूं’ने पहिल्याच आठवड्यात चांगला व्यवसाय केला. दुसऱ्या आठवड्यात स्थिती बिघडली असली तरी १० दिवसांत हीरो म्हणून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकलेला कपिलचा हा चित्रपट हिट चित्रपटांच्या पंक्तीत स्थान मिळविता झाला. इम्रान आणि कंगना यांचा ‘कट्टी-बट्टी’ची कमाई २४ कोटींवरच स्थिरावली, तर ‘हीरो’ने ३३ कोटी आणि ‘वेलकम बॅक’ने ९६ कोटींची कमाई केली.
येत्या शुक्रवारी प्रदीर्घ कालावधीनंतर ऐश्वर्या राय-बच्चनचे रुपेरी पडद्यावर पुनरागमन होत आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘जज्बा’ या चित्रपटात ऐश्वर्या आणि इरफान खान असून, ऐश्वर्या वकिलाच्या भूमिकेत आहे.

Web Title: Successful at Sing Box Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.