'पहला नशा गाणं ऐकलं की..'; सुचित्रा पिल्लईा मिळाली होती 'जो जीता वही सिकंदर'ची ऑफर, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:20 AM2024-05-14T11:20:08+5:302024-05-14T11:20:45+5:30
Suchitra pillai: सुचित्रा कॉलेजला असतांना तिला 'जो जीता वही सिकंदर'ची ऑफर मिळाली होती.
बॉलिवूडच्या (bollywood) इतिहासात आजवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्री गाजवली. यात काही आजही कलाविश्वात सक्रीय दिसतात. तर, काहींनी मात्र फार लवकर कलाविश्वातून काढता पाय घेतला. सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीये ती अभिनेत्री सुचित्रा पिल्लई (Suchitra pillai) हिची . ९० च्या काळात सुचित्राने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: राज्य केलं होतं. अलिकडेच तिने एक मुलााखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आमिर खानच्या 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमाविषयी भाष्य केलं आहे. या सिनेमामध्ये लीड रोलसाठी तिला विचारणा करण्यात आली होती.
अलिकडेच सुचित्राने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या फिल्मी करिअरवर भाष्य केलं. आमिर खानचा 'जो जीता वही सिकंदर' हा सिनेमा ९० च्या काळात बराच गाजला होता. या सिनेमात अभिनेत्री आयशा जुल्काने आमिरसोबत स्क्रीन शेअर केली होती. मात्र, तिच्यापूर्वी ही भूमिका सुचित्राला ऑफर झाली होती. सुचित्राने हा सिनेमा नाकारला. मात्र, त्यातील पहला नशा हे गाणं ऐकल्यावर तिला फार वाईट वाटतं असं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं.
"मी कॉलेजच्या प्रथम वर्षाला असतांना मला जो जीता वहीं सिकंदर या सिनेमाची ऑफर मिळाली होती. आयशाने (जुल्का) जो रोल केला होता त्यासाठी. त्यावेळी त्यांनी या सिनेमासाठी माझ्याकडे ६ महिने मागितले होते. १७ वर्षांची असलेली मी त्यावेळी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते. त्यावेळी ६ महिने देणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मी सिनेमासाठी नकार दिला. मला हा सिनेमा रिजेक्ट केल्याचं वाईट किंवा पश्चाताप नाहीये. फक्त या सिनेमातलं 'पहला नशा पहला खुमार' हे गाणं ऐकलं की फार वाईट वाटतं", असं सुचित्रा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "बाकी मला इतर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाही. प्रत्येकाची एक डेस्टिनी असते. त्यामुळे तो सिनेमा माझ्याकडे आला असता आणि मी केला असता. काय माहित कदाचित माझं आयुष्य त्यामुळे बदललं असतं." दरम्यान, सुचित्रा आजही कलाविश्वात सक्रीय आहे. अलिकडेच त्या अमेझॉन प्राइमच्या बिग गर्ल्स डोंट क्राइ या वेबसीरिजमध्ये झळकल्या होत्या.