संगीतावर सूफी अध्यात्माचा प्रभाव

By Admin | Published: July 10, 2017 02:46 AM2017-07-10T02:46:16+5:302017-07-10T02:46:16+5:30

सूफी हा इस्लाममधला एक पंथ आहे. या पंथाचे अनुयायी हिंदुस्थानात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत.

Sufism influenced by Sufi Spirituality | संगीतावर सूफी अध्यात्माचा प्रभाव

संगीतावर सूफी अध्यात्माचा प्रभाव

googlenewsNext

अमरेंद्र धनेश्वर
सूफी हा इस्लाममधला एक पंथ आहे. या पंथाचे अनुयायी हिंदुस्थानात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. सूफी पंथ हा समावेशक आहे आणि इतर धर्म आणि पंथांमधून येणाऱ्या गोष्टी आणि प्रथा/परंपरा सूफींनी आत्मसात केल्या आणि आपल्या उपासना पद्धतीत समाविष्ट केल्या. म्हणून सूफींना अधिकाधिक स्वीकारार्हता मिळत गेली. संगीत हे आपल्या भक्तीचे एक माध्यम म्हणून सूफींनी वापरले. बिजामुद्दीन औलिया हा सूफी संत तेराव्या शतकात होऊन गेला. त्याचे भक्त म्हणजे अमीर खुसरो आणि इतर अनेक जण. त्यांनी या संताच्या स्तुतीच्या रचना केल्या. या रचना रागदारी संगीताला अनुकूल आहेत.
त्यामुळेच या रचना अत्यंत भक्तिभावाने गायल्या जातात आणि ऐकल्या जातात आणि गाणारे फक्त मुसलमान गवईच असतात असे नव्हे. हिंदूही तितक्याच आत्मीयतेने या रचना गातात हे महत्त्वाचे. ईदनिमित्ताने ‘ताजमहाल टी हाउस’ने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात रामपूर सहसवान घराण्याचे ज्येष्ठ गायक मकबूल हुसेन खान यांचे गायन ऐकायला मिळाले. मकबूल हुसेन हे मुश्ताक हुसेन खान खाँसाहेबांच्या घराण्यातले. इश्तियाक हुसेन हे त्यांचे गुरू आणि वडील.
धीरगंभीर आवाजाची देणगी या गायकाला लाभली आहे. रागातील आलाप आणि विशेषत: मंद्र सप्तकाकडे झुकणारे त्यांच्या आवाजातून ऐकणे हे विशेष सुखावह असते. त्यांचा मुलगा आणि शिष्य झीशान हा एक उगवता तारा आहे. ‘अब मोरी नैया पार करो तुम ही’, ‘मियाँ की तोडी’ रागातील बंदिश त्यांनी गायली. ती अत्यंत हृदयस्पर्शी होती. ‘मंधमाद सारंग’ रागात ‘म’ किंवा ‘मध्यम’ या स्वराला प्राधान्य दिले जाते. ही रचनाही मनोवेधक होती. ‘भवानी दयानी’ ही ‘भैरवी’तील रचना त्यांनी अतिशय प्रभावीपणे सादर केली.
अकादमीचे पुरस्कार : संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार ही एकेकाळी अत्यंत प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. अत्यंत बुजुर्ग साधक, उत्कृष्ट परफॉर्मर्स आणि ज्येष्ठ अशा कलाकारांना हे पुरस्कार मिळत असत. आता माध्यमे या पुरस्कारांकडे फारसे लक्ष देत नाहीत. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ज्येष्ठ तबला गुरू अरविंद मुळगावकर आहेत. त्यांनी अमीर हुसेन खान खाँसाहेबांच्या शैलीचा अभ्यास आणि प्रसार केला आहे. प्रसिद्ध गायक प्रभाकर कारेकर यांनाही पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. कारेकरांनी कष्टाने विद्या मिळविली आणि रागसंगीत तसेच नाट्यसंगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळविले. पद्मा तळवलकरांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे. १९७० च्या दशकात युवा कलाकार म्हणून उदयाला आलेल्या या गायिकेने स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Sufism influenced by Sufi Spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.