आई आणि सासू नाही म्हणून वाढदिवशी अभिनेत्यानेच केलं पत्नीचं औक्षण, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:46 AM2024-12-03T10:46:21+5:302024-12-03T10:46:41+5:30
घरात बाईमाणूस नसल्याने अभिनेत्यानेच वाढदिवशी त्याच्या पत्नीचं औक्षण केलं. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतूनच अभिनेता कपिल होनराव घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने मल्हार शिर्के पाटील ही भूमिका साकारली होती. कपिल सोशल मीडियावर सक्रिय असून तो करिअर आणि वैयक्तिक अपडेट चाहत्यांना देत असतो.
नुकतंच कपिलने पत्नी रेणुका हिचा वाढदिवस साजरा केला. घरात बाईमाणूस नसल्याने कपिलनेच वाढदिवशी पत्नीचं औक्षण केलं. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तो म्हणतो, "तिचं औक्षण करायला तिची आई ह्या जगात नाही...आणि माझी आई ह्या शहरात नाही, गावी आहे. औक्षण हे काय बाईनेच करायला पाहिजे काय? म्हटलं आपणच करूया". कपिलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, कपिलने अनेक मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेनंतर कपिलने 'निवेदिता माझी ताई' मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. 'जय जय शनिदेव' या मालिकेत तो राजा विक्रमादित्यच्या भूमिकेत दिसला होता. कपिल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून तो करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना देत असतो.