घर घेण्यासाठी सुमोनाला करावा लागला होता स्ट्रगल; 'या' एका कारणामुळे बँकही देत नव्हती लोन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 04:36 PM2024-06-20T16:36:21+5:302024-06-20T16:36:48+5:30
Sumona Chakravarti: सुमोनाने वयाच्या २६ व्या वर्षी तिचं हक्काचं घर खरेदी केलं. परंतु, तिचा हा प्रवास सोपा नव्हता.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) . 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. यामध्येच आता ती रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी १४ या स्टंट रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा आहे. यामध्येच तिने 'इंडियन एक्स्प्रेस'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मुंबईत घर शोधतांना तिला कसा स्ट्रगल करावा लागला हे सांगितलं
सुमोनाने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यात करिअरमध्ये केलेल्या स्ट्रगलपासून घर खरेदी करेपर्यंत तिने अनेक किस्से सांगितले. सुमोनाने वयाच्या २६ व्या वर्षी तिचं स्वत:चं हक्काचं घर खरेदी केली. परंतु, तिचा घर घेण्याचा हा प्रवास सोपा नव्हता.
"मी २६ वर्षांची होते त्यावेळी मुंबईमध्ये माझं पहिलं हक्काचं घर खरेदी केलं. एका साध्या इमारतीमध्ये ते घर होतं. सगळ्यांनाच ठावूक आहे की,कलाकारांना ठराविक मासिक पगार मिळत नाही. त्यामुळे मलाही ठराविक अशी कोणतीही रक्कम महिन्याला मिळायची नाही. ठोस पगार नसल्यामुळे मला कोणतीही बँक लोन देत नव्हती. जो २० हजार रुपये कमवतो त्याला लोन देणं बँकेला योग्य वाटतं. पण, एका कलाकाराला लोन देणं म्हणजे त्यांना जोखमीचं काम वाटतं", असं सुमोना म्हणाली.
पुढे ती म्हणते, "कलाकार असल्यामुळे आमच्याकडे EMI भरण्याशिवाय पर्याय नसतो. आणि, खूप मोठा स्ट्रगल केल्यानंतर मी माझं होम लोन पूर्ण भरलं ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट असल्यासारखं आहे. मी आपल्या देशातल्या प्रत्येक तरुणीला कायम हेच सांगायचा प्रयत्न करते की, कायम तुमच्या डोक्यावर स्वत:चं छत असणं खूप गरजेचं आहे."
दरम्यान, सुमोना २०११ मध्ये बडे अच्छे लगते हैं या मालिकेत झळकली होती. त्यानंतर तिने 'कॉमेडी सर्कस' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल शो' हे गाजलेले रिअॅलिटी शो केले. लवकरच ती खतरों के खिलाडी 14 मध्ये स्टंट करतांना दिसणार आहे.