सनी देओल घेतोय परदेशात उपचार, अभिनेत्याला नेमकं झालंय काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:53 PM2022-07-27T16:53:50+5:302022-07-27T17:07:50+5:30
सनीवर आधी मुंबईत उपचार सुरू होते मात्र दोन आठवड्यापूर्वी तो उपचारासाठी परदेशात गेला आहे. राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान सनी देओल अनुउपस्थित राहिल्याने सर्वांनीच त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलची तब्येत ठीक नाही. सध्या त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे. सनी देओलला त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाठीला दुखापत झाल्याचे कळते. यानंतर पाठीच्या दुखापतीवर तो अमेरिकेत उपचार घेत आहे. सनी देओलच्या प्रवक्त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान सनी देओल अनुउपस्थित राहिल्याने सर्वांनीच त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. वाढता वाद पाहता, अभिनेताच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन जारी करून त्याच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले सनीचे प्रवक्ते?
सनी देओलच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'काही आठवड्यांपूर्वी शूटिंगदरम्यान सनी देओलच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्रथम मुंबईत उपचार सुरू होते आणि त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. यादरम्यान राष्ट्रपतीपदाची निवडणूकही पार पडली आणि ते देशात नसल्यामुळे त्यांना त्यात सहभागी होता आले नाही. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर भारतात परतणार आहे.
सनी देओलने अमेरिकेला जाण्यापूर्वी आठवडाभर मुंबईत उपचारही घेतले होते, मात्र कोणताही फायदा न झाल्याने त्याने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे सनी देओल संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही सहभागी होणार नाही.
या चित्रपटांमध्ये दिसणार सनी देओल
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सनी देओल काही दिवसांपूर्वी 'चूप' चित्रपटाचे शूटिंग करत होता. यात त्याच्यासोबत पूजा भट्ट आणि दुल्कर सलमान मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की करत आहेत. याशिवाय सनी देओल त्याच्या 'गदर 2' आणि 'अपने 2' या सुपरहिट चित्रपटांच्या सिक्वेलमध्येही काम करत आहे. तसेच, सनी देओल मल्याळम क्राईम-थ्रिलर चित्रपट 'जोसेफ'चा सिक्वेल असलेल्या 'सुर्या' चित्रपटातही काम करत आहे.