सनी देओलचं हैराण करणारं ट्रान्सफॉर्मेशन, लूकची होतेय सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:37 PM2024-06-11T14:37:41+5:302024-06-11T14:38:02+5:30
Sunny Deol : सनी देओल इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच आमिर खानसोबत काम करत आहे. आमिर खान निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत. 'लाहोर १९४७' असे या चित्रपटाचे नाव आहे.
सनी देओल (Sunny Deol) इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच आमिर खान(Aamir Khan)सोबत काम करत आहे. आमिर खान निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत. 'लाहोर १९४७' असे या चित्रपटाचे नाव आहे. सनी देओलने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक रील शेअर केला आहे. त्याचा ट्रान्सफॉर्मेशन लूक या रीलमध्ये पाहायला मिळतो. या चित्रपटातील त्याचा हा लूकही असू शकतो. या लूकमध्ये तो पहिल्या नजरेत ओळखता येत नाही. तो पूर्वीपेक्षा अधिक स्लिम आणि ट्रिम दिसत आहे.
सनी देओलने अनेक फोटो एकत्र करून ही रील बनवली आहे. या फोटोंमध्ये त्याच्या शरीराचा फक्त वरचा भाग दिसत आहे. चेहऱ्यावरील जॉ लाइन दिसत आहे. त्याने आपले ऍब्स फ्लाँट केले नाहीत, परंतु त्याचा चेहरा आणि खांदे पाहून एखाद्याला असे वाटते की त्याच्यात खूप मोठे ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे. या लूकमध्ये तो त्याच्या अर्ध्या वयाचा दिसतो आहे.
सनी देओलने हा लूक कोणत्या प्रोजेक्टसाठी केला आहे, हे आगामी दिवसात कळेल. त्याचा नवा लूक शेअर करताना सनीने लिहिले की, “हिंदुस्तान जिंदाबाद होता, जिंदाबाद आहे आणि जिंदाबाद राहील. काही नवीन लूक दाखवत आहे.” हे कॅप्शन सनीच्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटातील डायलॉग आहे. त्याचे हे कॅप्शन 'गदर ३'शीही जोडले जात आहे.
मात्र, सनी देओलचा हा लूक 'गदर ३'मधील आहे की 'लाहोर १९४७'मधील आहे हे स्पष्ट झालेले नाही. २००१ मध्ये रिलीज झालेला 'गदर' ब्लॉकबस्टर ठरला होता. २२ वर्षांनंतर त्याचा सीक्वल 'गदर २' आला आणि तोही ब्लॉकबस्टर ठरला. यानंतर निर्मात्यांनी ‘गदर ३’ची घोषणाही केली आहे. हा चित्रपट भारत आणि पाकिस्तानशीही संबंधित असेल. तर, 'लाहोर १९४७' बद्दल बोलायचे झाले तर त्यात सनी देओलसोबत अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. यात प्रीती झिंटा आणि शबाना आझमी देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा भारत आणि पाकिस्तानची फाळणी आणि त्यातून होणाऱ्या त्रासावर आधारित असेल.