सनी लिओनीचा तुर्की-सीरियातील भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात, कमाईचा १० टक्के हिस्सा देणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 03:45 PM2023-02-19T15:45:43+5:302023-02-19T15:46:42+5:30
तुर्की आणि सीरियातील विनाशकारी भूकंपात हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे
तुर्की आणि सीरियातील विनाशकारी भूकंपात हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर लाखो लोक जखमी आणि बेघर झाले आहेत. दोन्ही देशांमधील सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून हजारो इमारती कोसळल्या आहेत. ठिकठिकाणी फक्त मातीचे ढिगारेच्या ढिगारे पाहायला मिळत आहेत. तर अजूनही बचाव कार्य सुरू आहे. तुर्की आणि सीरियाच्या या संकटकाळात जगभरातील अनेक देश मदतीसाठी पुढे आले आहेत. यात आता बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिनंही कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत करणार आहेत.
तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी सनी आपल्या कॉस्मेटिक ब्रँडच्या फेब्रुवारी महिन्यातील एकूण कमाईपैकी १० टक्के हिस्सा देणार आहे. संकटकाळात भूकंपग्रस्तांच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना नव्यानं आयुष्य सुरू करता यावं यासाठी शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत, अशी भावना सनीनं व्यक्त केली आहे.
सनीनं जनतेलाही केलं आवाहन
सनी आणि वेबर तु्र्की आणि सीरियातील अशा स्वयंसेवी संस्थांना मदत पुरवणार आहेत की ज्या तेथील भूकंपग्रस्तांसाठी काम करत आहेत. याशिवाय सनीनं इतरांनाही यात सामील होण्याचं आवाहन केलं आहे. याआधी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनंही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केलं होतं.
अजूनही अनेक लोक अडकलेले
सीरिया आणि तुर्कीत ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले होते. घटनेच्या जवळपास १२ दिवसांनंतरही बचावकार्य सुरू आहे. तुर्की आणि सीरियातील या प्रलयकारी भूकंपात आतापर्यंत ४३,३६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर हा आकडा दिवसेंदिवस वाढत जात आहे.