सनीची ‘घायल...’मुळे जोरदार वापसी
By Admin | Published: February 9, 2016 02:39 AM2016-02-09T02:39:30+5:302016-02-09T02:39:30+5:30
सनी देओल दिग्दर्शित ‘घायल वन्स अगेन’ला बॉक्स आॅफिसवर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तथापि, ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाला चाहत्यांकडून अपेक्षेनुसार प्रतिसाद नाही मिळाला.
सनी देओल दिग्दर्शित ‘घायल वन्स अगेन’ला बॉक्स आॅफिसवर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तथापि, ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाला चाहत्यांकडून अपेक्षेनुसार प्रतिसाद नाही मिळाला. सनी देओलची दशा आणि दिशा बदलणारा पंधरा वर्षांपूर्वीच्या ‘घायल’ या चित्रपटाचा पुढचा भाग असलेला ‘घायल वन्स अगेन’ला चाहत्यांनी जोरदार पसंती दिली. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ७ कोटी, तर शनिवारी ७ कोटीपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या ‘घायल वन्स अगेन’ने रविवारी ८.४० कोटींचा गल्ला जमवला. या तीन दिवसांतील एकूण कमाईचा आकडा २३ कोटींपेक्षा अधिक आहे.
‘घायल वन्स अगेन’सोबतच प्रदर्शित झालेला ‘सनम तेरी कसम’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाला तिकीट खिडकीवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. टीव्हीच्या पडद्यावरून रुपेरी पडद्यावर झळकणारा अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मारवा या जोडीच्या या चित्रपटाची सुरुवातच धिमी राहिली. पहिल्या दिवशी १ कोटी, दुसऱ्या दिवशी १.५५ कोटी आणि तिसऱ्या दिवशीही एवढीच कमाई ‘सनम तेरी कसम’ला करता आली. नवीन चेहरे आणि दुबळ्या प्रमोशनमुळे फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे जाणकार सांगतात.
राजकुमार हिरानी प्रॉडक्शनचा आणि आर. माधवन आणि रितिका सिंह अभिनित ‘साला खडूस’ला सुरुवातीला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद नव्हता. हिंदी आणि तामिळ भाषेतील या चित्रपटाची पहिल्या आठवडाअखेरीस एकूण कमाई १२ कोटी राहिली. हिंदीपेक्षा तामिळ भाषेतील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. यासोबतच प्रदर्शित झालेला सनी लिओनच्या ‘मस्तीजादे’ने पहिल्या आठवड्याअखेरीस ११ कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला. दुसऱ्या आठवड्याअखेरीस कमाईचा आकडा २८ कोटींवर गेला. शंभर कोटी क्लबमध्ये स्थान मिळविणाऱ्या अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’ने ११७ कोटी कमावले आहेत. पुढच्या आठवड्यात दोन बडे चित्रपट झळकणार आहेत. आदित्य राय कपूर, तब्बू आणि कतरिना कैफची प्रमुख भूमिका असलेला ‘फितुर’ आणि टी-सीरिजचा ‘सनम रे’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.