बिग बॉस मराठीची पहिली स्पर्धक आहे ही नृत्यांगणा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 04:34 PM2019-04-29T16:34:30+5:302019-04-29T16:35:36+5:30
सोशल मीडियावर हा प्रोमो लाँच झाल्यापासून या कार्यक्रमात लावणी क्षेत्रातील एक दिग्गज कलाकार बिग बॉसच्या घरात झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे
Bigg Boss Marathi 2 चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला एक नर्तिका लावणी करताना दिसत असून तिची लावणी पाहून लोक धुंद होत फेटे उडवताना दिसत आहेत. तसेच या प्रोमोसोबत आपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवलेली नार, #BiggBossMarathi2 च्या घरात कुणाकुणाची झोप उडवणार? अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर हा प्रोमो लाँच झाल्यापासून या कार्यक्रमात लावणी क्षेत्रातील एक दिग्गज कलाकार बिग बॉसच्या घरात झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे आणि ही लावणीतील दिग्गज दुसरी कोणी नसून लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या नटरंगी नार या कार्यक्रमाचे सध्या जोरदार प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे आपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडवलेली नार ही सुरेखा पुणेकरच असल्याची चर्चा रंगली आहे.
सुरेखा पुणेकर या आज लावणी समाज्ञी असल्या तरी त्यांच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हमालीचे काम करत असत. अनेकवेळा खायला देखील त्यांच्या घरात काहीही नसायचे. पण या सगळ्या वाईट परिस्थितीवर मात करत त्यांनी आज इतके यश मिळवले. सुरेखा पुणेकर यांना महाराष्ट्रात चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरात पाहायला त्यांच्या फॅन्सना नक्कीच आवडेल यात काहीच शंका नाही. सुरेखा पुणेकर आता या कार्यक्रमात सहभागी होतात की नाही हे आपल्याला हा कार्यक्रम सुरू झाल्यावरच कळेल.
Bigg Boss Marathi 2 च्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना यंदा बिग बॉसच्या घरात कोणाकोणाचा समावेश असणार याची उत्सुकता लागली होती. बिग बॉस मराठी 2 च्या पहिल्या प्रोमोनुसार यंदा घरात राजकारणातील एखादी व्यक्ती दिसणार अशी शक्यता वर्तवली जात होती. आता ही व्यक्ती कोण असेल? याचा अंदाज रसिक लावतीलच पण लवकरच हे नाव कोण असेल याचा उलगडा होणार आहे. ‘शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी... आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का बिग बॉस मराठी २ च्या घरात वर्दी? ’असा प्रश्न मांजरेकरांनी रसिकांना विचारला होता.