सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी CBIने फेसबुक, गुगलकडे अभिनेत्याने डिलीट केलेला मागितला डेटा आणि चॅट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 02:03 PM2021-11-09T14:03:53+5:302021-11-09T14:04:39+5:30
सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या घरात १४ जून २०२० रोजी आढळला होता.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला जवळपास दीड वर्षे उलटून गेले आहेत. या प्रकरणाचा तपास अद्याप सीबीआय करते आहे आणि अद्याप त्यांच्या हाती ठोस काहीही लागले नाही. १४ जून, २०२० रोजी सुशांतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसानंतर ईडी आणि एनसीबीने मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग्स अँगलनेही तपास केला होता. दरम्यान आता असे वृत्त समोर आले आहे की, सीबीआयने याप्रकरणी सुशांतच्या सोशल मीडिया अकाउंटवरून डिलीट झालेले चॅट्स, मेसेज आणि पोस्ट पुन्हा तपासासाठी हवे आहेत.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सीबीआयने अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील म्युचल लीगल असिस्टंट ट्रीटी (MLAT)ला संपर्क केला आहे. इथे सीबीआयने गुगल आणि फेसबुकच्या हेडक्वॉर्टरमध्ये सुशांत सिंग राजपूतने डिलीट केलेले चॅट्स, ईमेल्स आणि पोस्टचा डेटा मागितला आहे. या रिपोर्टमध्ये नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, एजेंसीला या प्रकरणाच्या निकालात कोणतीही ढिलाई करायची नाही आहे. अधिकाऱ्यांना जाणून घ्यायचे आहे की, कोणती डिलीट केलेली पोस्ट किंवा चॅट केसमध्ये उपयोगी येईल की नाही.
सीबीआयला या केसच्या तपासात आणखी थोडा वेळ लागणार आहे. कारण MLATकडून डेट मिळवण्यासाठी जास्त वेळ लागतो. सुशांत सिंग राजपूतच्या फॅमिलीचा वकील विकास सिंग यांनीदेखील सीबीआयच्या या पावलाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना अंतिम निकालावर येण्यापूर्वी सखोल तपास करायचा आहे. सुशांतच्या मृत्यूमागे बरेच राज लपलेले असतील कारण यात कोणत्याच साक्षीदार किंवा फुटेजवरून त्या दिवशी काय घडले हे समजू शकले नाही.