कोरोना काळात लंडनमधील 'छूमंतर'चा सुव्रत जोशीने शेअर केला अनुभव

By तेजल गावडे | Published: November 5, 2020 07:46 PM2020-11-05T19:46:48+5:302020-11-05T19:47:38+5:30

'छूमंतर' या मराठी चित्रपटाचे नुकतेच लंडनमध्ये शूटिंग पार पडले.

Suvrat Joshi shared his experience of 'Chhumantar' in London during the Corona period | कोरोना काळात लंडनमधील 'छूमंतर'चा सुव्रत जोशीने शेअर केला अनुभव

कोरोना काळात लंडनमधील 'छूमंतर'चा सुव्रत जोशीने शेअर केला अनुभव

googlenewsNext

छूमंतर या मराठी चित्रपटाचे नुकतेच लंडनमध्ये शूटिंग पार पडले. या चित्रपटात रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना आणि श्रीनिवास पोकळे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाउननंतर परदेशात चित्रीत केला गेलेला छूमंतर हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटातील कलाकार सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत होते. आता सर्व कलाकार मायदेशी परतले आहेत. नुकतेच सुव्रत जोशीने इंस्टाग्रामवर त्याला या चित्रपटाच्या शूटिंगवेळी आलेला अनुभव शेअर केला आहे.


सुव्रत जोशीने इंस्टाग्रामवर छूमंतरच्या सेटवरील काही फोटो शेअर करत लिहिले की, आधीच अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला या वर्षी कोरोनामुळे अजूनच अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागते आहे. अशा वेळी अनेक निर्मात्यांनी धाडस दाखवून पुन्हा व्यवसायात उडी घेतली आहे. मी ऑक्टोबरमध्ये भारतात परत यायच्या तयारीत असताना मला नितीन वैद्य यांचा फोन आला आणि त्यांनी मला लंडन मधेच थांबायला सांगितले. आपण एक नवीन चित्रपट करतोय तोही दोन भाषांमधे!

 
पुढे सुव्रत म्हणाला की, आताच्या भयंकर अस्थिर परिस्तिथीत भारतातून येऊन लंडन मध्ये चित्रपट करायची तयारी दाखवायला केवळ धाडसच नाही तर चिकाटी आणि पद्धतशीर नियोजन अतिशय आवश्यक होतं. एक चूक आणि अख्खी (किंवा अर्धी) फिल्म डब्यात! अश्या परिस्थितीत अकलूज वरून रिंकू,अमरावतीहून श्रीनिवास पोकळे, बडोद्याहून प्रार्थना आणि ऋषी तसंच वल्लरी मुंबईतून लंडनला आले. भारतीय लोक हे नियोजनाच्या बाबतीत जर अघळपघळ असतात आणि चित्रपटातील लोक याला अपवाद नाहीत. लंडन अगदी विरुद्ध, नियम म्हणजे नियम. पण यावेळी आमच्या चित्रपटाचा सेट दृष्ट लागेल असा शिस्तबद्ध होता. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी, व्यक्तीसाठी प्लॅन बी तयार ठेवण्यात आला होता. पर्याय नव्हता तो नटांना! ते एकदा दिसले की बदलता येणार नव्हते,तसेच त्यांचा व्हिसा आणि परवानग्या वगैरे घोळ होतेच. त्यामुळे त्यांनी प्रचंड काळजी घ्यायची होती. क्रु म्हणजे मेकअप, कॅमेरा, निर्मिती या सर्व विभागातील लोकांनी येण्याचे धाडस दाखवले आणि नियम पाळत स्वतःचे कार्यभारही सांभाळले. 


एका महिन्यात 'छुमंतर' मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांतून पूर्ण झाला. आता मराठी लोकांना हा मराठीत तर इतर भाषिक लोकांना हिंदीतून हा चित्रपट बघायला मिळेल. मला आमचे दिग्दर्शक समीर जोशी आणि छायाचित्रकार मिलिंद जोग यांचेही विशेष अभिनंदन करावेसे वाटते. त्यांनी सगळ्या संघाची मोट बांधून ठेवली. कलाकारांनी पण विशेष काळजी घेतली. सुट्टी मिळाली तरी नियमांचे पालन करत,मोहाला बळी न पडता सगळे मुकाट हॉटेलात बसून राहिले, असे सुव्रत सांगत होता.


'छुमंतर' हा लॉकडाउननंतर परदेशात चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट आहे आणि त्याचा भाग असल्याचा अतिशय आनंद होत असल्याचे सुव्रत म्हणाला आणि पुढे म्हटले की, एरव्ही मी पडद्यामागे घडलेल्या गोष्टींना फार महत्व देत नाही,त्यात आलेल्या 'आव्हानांचे' भांडवल करणेही मला आवडत नाही. प्रत्येक कामात अशी संकटे येतात आणि कलाक्षेत्रात कला महत्वाची! पण तरीही यावेळी परिस्थिती पूर्ण वेगळी होती. समोरील अनिश्चितता अभूतपूर्व होती. आता लंडन मध्ये पुन्हा लॉक डाउन जाहीर झाला आहे पण आमचा सर्व संच तिथे काम पूर्ण करून आपापल्या गावी सुखरूप परतला आहे.याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो आहे.

Web Title: Suvrat Joshi shared his experience of 'Chhumantar' in London during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.