स्वरा भास्करनं डोक्यावर ग्लास ठेवून केला डान्स; कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयाचं केलं सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 06:53 PM2021-11-21T18:53:17+5:302021-11-21T18:53:38+5:30
Swara Bhaskar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा. यानंतर स्वरा भास्करनं सोशल मीडियावरून शेअर केला व्हिडीओ.
गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी या निर्णयाची घोषणा केली. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. दरम्यान, यानंतर स्वरा भास्कर हीचा व्हिडीओ समोर आला असून ती आपल्या डोक्यावर ग्लास ठेवून पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
स्वरा भास्कवर अनेकदा आपल्या वक्तव्यांवरून चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिच्या वक्तव्यांवरून टीकाही करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर स्वरा भास्करनं एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. पार्टी ट्रिक : हे मी माझ्या वडिलांकडून शिकले. कृषी कायदे रद्द केल्यामुळे सेलिब्रेशन तर बनतंच असंही तिनं या व्हिडीओसोबत लिहिलं आहे.
काय म्हणाले होते मोदी?
शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मोदींनी जाहीर केलं.