तापसीने केली प्रिती झिंटासोबत स्वत:ची तुलना; म्हणाली, 'मी तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करते, कारण...'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 12:38 PM2024-06-18T12:38:12+5:302024-06-18T12:39:16+5:30
Taapsee Pannu: प्रिती झिंटामुळेच मला इंडस्ट्रीत घेतलं असंही तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या सिनेमासोबतच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही कायम चर्चेत येत असते. २०१३ मध्ये डेव्हिड धवन याच्या 'चश्मेबद्दूर' या सिनेमातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. आणि, पाहता पाहता 'पिंक', 'थप्पड', 'मुल्क', 'हसीना दिलरुबा' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा दिले. अलिकडेच तापसीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने स्वत:ची तुलना प्रिती झिंटासोबत केली आहे. इतकंच नाही तर केवळ माझा चेहरा तिच्याशी मिळताजुळता असल्यामुळे माझी इंडस्ट्रीत एन्ट्री झाल्याचंही तिने म्हटलं.
अलिकडेच तापसीने शिखर धवनच्या 'Dhawan Karenge With Shikhar Dhawan' या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या करिअरवर भाष्य केलं आहे. या पॉडकास्टमध्ये तिने असं एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
"मी बऱ्यापैकी प्रिती झिंटासारखी दिसते. तिच्यासारखा माझा लूक असल्यामुळे मला मुळात बॉलिवूडमध्ये आणण्यात आलं. प्रिती झिंटामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी आहे हे वेगळं काही सांगायला नको. ते सगळ्यांनाच ठावूक आहे", असं तापसी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मला असं वाटतंय मला तिच्या (प्रिती झिंटा) प्रतिष्ठेला शोभेल असंच काम केलं पाहिजे. कारण, मी तिच्या नावामुळेच आज इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यामुळे मी कायम तिच्यासारखं होण्याचा प्रयत्न करते. प्रिती झिंटा खूप हुशार आणि तितकीच चांगली व्यक्ती आहे."
दरम्यान, अलिकडेच तापसीने तिचा प्रियकर मॅथियास बो याच्यासोबत लग्नगाठ बांधली. तापसीने गुपचूप पद्धतीने लग्न करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. त्यामुळे या लग्नसोहळ्यामुळेही ती मध्यंतरी चर्चेत आली होती. अलिकडेच ती राजकुमार हिरानी यांच्या डंकी या सिनेमात झळकली होती. त्यानंतर आता लवकरच ती 'फिर आई हसीन दिलरुबा' या सिनेमात दिसणार आहे.